पालिका ‘एस’ विभाग आणि ‘एल’ विभाग यांच्या अंतर्गत येणाऱ्या पवई परिसरातील कोरोना बाधितांची संख्या रविवार, २६ एप्रिल २०२० रोजी बावीसवर पोहचली आहे. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, ८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर १४ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. पाठीमागील चार दिवसात यात ७ रुग्णांची वाढ झाली आहे.
१६ मार्चला हिरानंदानी येथील एका इमारतीत राहणारी परदेश प्रवासाचा इतिहास असणारी ४४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर जवळपास १५ दिवसाने मार्च महिना अखेरीस आयआयटी पवई येथील रहिवाशी इमारतींमध्ये राहणारे ३४ वर्षीय व्यावसायिक कोरोना पॉझिटीव्ह मिळून आले होते. त्यानंतर केवळ एप्रिल महिन्यात आत्तापर्यंत २० कोरोना बाधित पवईत मिळून आले आहेत. विशेषतः यातील जास्तीत जास्त रुग्ण हे चाळ सदृश्य आणि मोठी लोकवस्ती असणाऱ्या परिसरात मिळून आले आहेत.
४ दिवसात पवईत ७ रुग्णांची भर
पाठीमागील ४ दिवसात पवईत ७ रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये २३ एप्रिलला पवई पोलीस ठाण्याच्या पाठीमागील म्हाडा इमारतीत राहणारे ५५ वर्षीय व्यावसायिक कोरोना बाधित असल्याचे समोर आले. या इमारतीला सील करण्यात आले आहे. त्यानंतर शुक्रवार २४ एप्रिलला यात ३ रुग्णांची भर पडली, यातील दोन शासकीय कर्मचारी आहेत तर एक वैद्यकीय क्षेत्रातील आहे.
“२४ तारखेला मिळालेल्या रुग्णांमध्ये तुंगागाव येथील एक २२ वर्षीय तरुणी कोरोना बाधित असल्याचा संशय आहे. ती नाहूर येथील एका फार्मसी कंपनीत काम करते. दुसऱ्या केसमध्ये आयआयटी पवई येथील महात्मा फुलेनगर परिसरात राहणारा २३ वर्षीय पालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह मिळून आला आहे” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा: पवई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
ते पुढे म्हणाले, “अजून एका केसमध्ये जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर मिलिंदनगर येथे असणाऱ्या आयईएस शाळेच्या समोरील एका कंपाऊंडमध्ये राहणारा वैद्यकीय कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. तर मिलिंदनगर परिसरात १६ एप्रिलला मिळून आलेल्या रुग्णाची पत्नी सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.”
रविवार २६ एप्रिलला आयआयटी पवई येथील फुलेनगर परिसरात दोन कोरोना बाधित मिळून आले आहेत. यात एक २६ वर्षीय तरुण असून, तो पालिकेच्या रुग्णालयात काम करतो. तर दुसऱ्या केसमध्ये ५७ वर्षीय पोस्टाच्या मुख्य कार्यालयात काम करणारे एक कर्मचारी यांचा अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे पवईतील कोरोना बाधितांची संख्या आता बावीसवर पोहचली आहे.
एका कोरोना बाधिताचा मृत्यू
पवईतील तुंगागाव येथील लोकवस्तीत यापूर्वी मिळून आलेल्या दोन रुग्णांपैकी एकावर चेंबूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असून, एका रुग्णाचा ११ एप्रिलला मृत्यू झाला असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
पवईत कोरोना बाधित रुग्ण मिळून आलेले परिसर
हिरानंदानीमधील रहिवाशी इमारत (१), आयआयटी पवई येथील तिरंदाज शाळेजवळील रहिवाशी इमारत (१), तिरंदाज शाळेजवळील वस्ती (१), चैतन्यनगर चाळसदृश्य लोकवसाहत (४), महात्मा जोतीबा फुलेनगर, आयआयटी मार्केट (४), गोखलेनगर, आयआयटी मेनगेट (१), गौतमनगर, आरे कॉलोनी रोड (१), पासपोली व्हिलेज, नीटी (१), मिलिंदनगर जेव्हीएलआर (३), आयआयटी स्टाफ कॉर्टर्स, एस एमशेट्टी शाळेजवळ (१), रामबाग म्हाडा (१), तुंगागाव (३).
(वरील यादीत सांगण्यात आलेल्या सर्व ठिकाणांची नावे आणि बाधितांची आकडेवारी ही बृहनमुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस यांच्याकडील नोंदीतून घेण्यात आली आहे.)
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.