गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! गर्जनेत, ढोल-ताशांच्या गजरात आणि आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात शनिवारी अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतींचे पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत भावपूर्ण आणि जड अंतकरणाने पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर आणि पवई, चांदिवली येथील कृत्रिम तलावांवर विसर्जन करण्यात आले.
मुंबई – पुण्यात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. या वर्षी देखील मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत आहे. मंगळवारी वाजत-गाजत बाप्पांचे आगमन झाले आहे. काही घरगुती आणि सार्वजनिक बाप्पांनी पाच दिवस पाहूणचार घेतल्यानंतर शनिवारी आपल्या भक्तांचा निरोप घेतला.
पवईमध्ये पवई तलाव मुख्य गणेशघाट आणि गणेशनगर गणेशघाट अशा दोन ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली होती. सोबत पवईत ३ ठिकाणी तर चांदिवलीत संघर्षनगर येथे कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले होते. पावसाची संततधार सुरु असल्याने हातगाडी, टेम्पो, रिक्षा, कारमधून बाप्पाना विसर्जनासाठी आणले गेले. संपूर्ण परिसरात पवई आणि साकिनाका पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली होती.
कृत्रिम तलावांवर लोकांची ओढ
पवई तलाव आणि संपूर्ण रस्त्याने होणारी गर्दी रोखण्यासाठी पालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून पवई आणि चांदिवली भागात बनवण्यात आलेल्या कृत्रिम तलावांकडे गणेश विसर्जनासाठी लोकांची ओढ पहायला मिळाली.
No comments yet.