पवई परिसरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मंगळवारी, २८ एप्रिल २०२० रोजी एकाच दिवसात पवई परिसरात अजून ५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये २ महिला तर ३ पुरुषांचा समावेश आहे.
महानगरपालिका ‘एस’ भांडूप विभागात २७ एप्रिलच्या आकड्यानुसार १५४ कोरोनाबाधित मिळून आले आहेत. त्यामुळे आता हा विभाग रेड झोनच्या अंतर्गत जाण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. या विभागात भांडूप, कांजूरमार्गसह पवई परिसराचा सुद्धा समावेश आहे.
पवईतील हिरानंदानी परिसरात १६ मार्चला कोरोना बाधित मिळून आलेल्या ४४ वर्षीय महिलेपासून या विभागात कोरोना बाधित मिळण्यास सुरुवात झाली होती. हिच पवईतील कोरोना बाधित मिळण्याची सुरुवात सुद्धा होती. तर २८ एप्रिल २०२० पर्यंत पवईतील बाधितांची संख्या २७ वर (एल विभागात येणाऱ्या तुंगागाव येथील ३ रुग्ण पकडून) पोहचली आहे. मंगळवारी कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या ५ बाधितांचा यात समावेश आहे.
२३ एप्रिल २०२० रोजी रामबाग पवई येथील म्हाडा कॉलोनीत राहणारे एक व्यावसायिक कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते. याच कुटुंबातील ३ व्यक्तींचा अहवाल मंगळवारी कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये त्यांच्या पत्नी (४९ वर्ष) आणि दोन मुलांचा (३२ आणि २७ वर्ष) समावेश आहे. पत्नीला हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, २ मुलांना मुलूंड मिठागृह येथे इन्स्टीट्युट अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा: गणेशनगरमधील रहिवाशांची ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला ७६ हजाराची मदत
पवईतील आयआयटी मार्केट येथील फुलेनगर परिसरात सुद्धा मंगळवारी २ कोरोना बाधित मिळून आले आहेत. यात २४ एप्रिल रोजी मिळून आलेल्या एका बाधिताच्या पत्नीसह एका ३१ वर्षीय तरुणाचा सुद्धा समावेश आहे.
फुलेनगर परिसरात भीतीचे वातावरण
आयआयटी मार्केट येथील फुलेनगर परिसरात आत्ता पर्यंत ६ रुग्ण मिळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे रुग्ण राहत असलेल्या परिसरांना सिल करण्यात आल्याने नागरिकांना घरात राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. छोट्या छोट्या घरात राहणाऱ्या मोठ्या कुटुंबाना हे अवघड होत आहे. त्यातच अनेकांच्या घरात स्वतंत्र शौचालय नसल्याने त्यांना नाविलाजास्तव सार्वजनिक शौचालय वापरण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका वाढत असल्याने नागरिक शौचास जाण्यासही घाबरत असल्याचे येथील नागरिकांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
संघर्षनगर, चांदिवली येथे सुद्धा सापडले दोन कोरोना बाधित
महाराष्ट्रात कोरोना पोहचून २ महिने होत आले असताना मुंबईतील ग्रीन झोनमधील एक असणाऱ्या चांदिवली येथील संघर्षनगर भागात सुद्धा दोन आता कोरोना बाधित मिळून आले आहेत. दोघांनाही उपचारासाठी दाखल करत परिसर सील करण्यात आला आहे. बोरीवली राष्ट्रीय उद्यान आणि आसपासच्या परिसरात वसलेल्या अनेक झोपडपट्टीधारकांना दशकापूर्वी झोपडपट्टी पुनर्विकास योजने अंतर्गत चांदिवली येथील या भागात वसवण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात लोक येथील इमारतींमध्ये राहत असल्याने कोरोना प्रसाराचा मोठा धोका पाहता प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.