पवईत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गुरुवारी, ३० एप्रिलला हा आकडा ३३ वर पोहचला आहे. बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवसात ६ रुग्णांची यात वाढ झाली आहे. बाधित रुग्णांमध्ये ३ रुग्ण वैद्यकीय कर्मचारी, १ पोलीस कर्मचारी तर एका ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे.
मुंबईकरांचे नेहमीच खास आकर्षण राहिलेला पवई परिसर आता रेड झोनमध्ये पोहचला आहे. या परिसरात दररोज रुग्णांची वाढ होत चालल्याने येथील लोकांची चिंता वाढत चालली आहे. मात्र यात घाबरून जाण्याचे काहीच कारण नसून, नागरिकांनी घरीच राहणे आणि सुरक्षित राहणे आवश्यक आहे. पालिका आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
पवईतील आयआयटी येथील गौतमनगर भागात राहणारा २३ वर्षीय तरुण हा कोरोना बाधित असल्याचे बुधवारी, २९ एप्रिलला समोर आले. तो मुंबई पोलिसात कार्यरत असून, मुंबईत कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असणाऱ्या रुग्णालय भागात कर्तव्यावर होता. याच दिवशी पवईतील एका कॉलोनीत राहणारा अजून एक तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
गुरुवारी, ३० एप्रिलला सकाळी पवई परिसरात पुन्हा खळबळ माजली. येथील ३ परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून असल्याने पालिकेने बाधित मिळून आलेले परिसर सील करायला घेतले होते. गुरुवारी गोखलेनगर भागात राहणारे २३ वर्षीय आणि २५ वर्षीय तरुण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. तिरंदाज व्हिलेज येथील एका २३ वर्षीय तरुणाचा अहवालही गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हे तिन्ही तरुण पवईतील एका नामांकित रुग्णालयात काम करत आहेत. तर राज ग्रंडेर इमारतीत राहणाऱ्या ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात येत आहे. यामुळे पवईत कोरोना बाधितांची संख्या आता ३३ वर पोहचली आहे.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.