प्रतिक कांबळे | पवईतील चैतन्यनगर भागातील पंचशील निवास सोसायटी लगत राहणारे प्रदिप भोगल यांच्या घरात शोर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवार, २९ ऑगस्टला सकाळी घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून, घरातील साहित्य जळून खाक झाले आहे.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे कोरोनाचे सावट आणि हातचा रोजगार बंद असल्याने बरेच कुटुंबे परिवारासहित आपल्या गावी गेले आहेत. एका महिन्यापूर्वी भोगलही आपल्या कुटुंबासह गावी गेले आहेत, असे त्यांच्या भाडेकरूने आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
बंद खोलीतून धुराचे लोट बाहेर येताना आसपासच्या रहिवाशांना दिसताच स्थानिकांनी सतर्कता बाळगत दरवाजा उघडून घरातील वीजपुरवठा बंद केला. घरातील गॅस सिलेंडर आणि ज्वलनशील पदार्थ तात्काळ बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दल व पोलिसांना पाचारण करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
“स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत मदतकार्य केल्यामुळे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही,” असे याबाबत बोलताना स्थानिक डॉक्टर संकेता सिंग यांनी सांगितले.
सध्या कोरोनाचे सावट असताना आपल्या जीवाची पर्वा न करता संकट प्रसंगी तरूणांनी केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments yet.