एका पंचतारांकित हॉटेलच्या भिंतीखाली बोगदा खोदून रोमन योद्ध्याचा पितळी पुतळा चोरणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अलीकडेच अटक केली आहे. रोमन योद्ध्याच्या या ३०० किलोच्या पुतळ्याची किंमत ७ लाख रुपये आहे. चोरट्यांनी जंगलात लपवून ठेवलेले पुतळ्याचे तुकडे पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले आहेत.
रॉयल पाम्सच्या आत असलेल्या इम्पिरियल पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमध्ये चोरी झाल्याची तक्रार १२ ऑक्टोबरला नोंद करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे हॉटेल काही दिवसांपासून पूर्ण कार्यरत नाही आणि रात्रीच्या वेळी या परिसरात विशेष प्रकाश व्यवस्था सुद्धा नाही. ज्या ठिकाणी पुतळा उभा होता तेथे सीसीटीव्ही नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.
हॉटेलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबरला परिसरात फेऱ्या मारताना सुमारे सात ते आठ फूट उंच असणारा हा पुतळा जागेवरच दिसला होता.
विविध पथके बनवून पोलीस याचा तपास करत असताना पोलिसांनी आरे आणि पवईच्या चाळसदृश्य वसाहतींमध्ये याबाबत चौकशी सुरु केली होती. त्यांनी भंगार विक्रेत्यांचीही चौकशी केली मात्र काहीच पुरावे हाती लागू शकले नाहीत.
तपास सुरु असताना टीमला हॉटेलच्या भिंतीच्या बाहेर जड वस्तू ओढल्याच्या काही खुणा मिळून आल्या. त्याच खुणांपासून काही अंतरावर एक लहान बोगदा सापडला जो हॉटेलच्या भिंतीखाली खोदून दुसऱ्या टोकाला जंगलात जात होता.
यासंदर्भात खबरयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी २० वर्षीय इस्माईल शेख आणि १९ वर्षीय जलील शेख यांना अटक केली. इस्माईल हा मेकअप कलाकार म्हणून काम करतो.
“त्यांनी पितळी पुतळ्याचे तुकडे करून ते जंगलात लपवले होते आणि ते सुमारे २ लाख रुपयांना भंगारात विकण्याचा विचार करत होते. त्यांच्या घरी चोरीचे एअर कंडिशनर आणि फ्रीज सुद्धा मिळून आले. या दोघांनी रॉयल पाम्स इस्टेटमधील व्हिलामधून ही उपकरणे चोरली आहेत. बोगदा बंद करण्यात आला आहे. या दोघांचा कोणत्या टोळीशी संबंध आहे का? याचा शोध सुरु आहे, असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
No comments yet.