सजेस्ट अँड एडिट पर्यायामुळे भामटे बॅंक ग्राहकांना करत आहेत लक्ष्य
आपल्या बँकेचा नवीन पत्ता शोधणे पवईतील एका वृद्धाला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्याने बँकेच्या नंबरच्या जागेवर आपला नंबर दिला आणि वृद्धाची वैयक्तिक माहिती मिळवून त्यांच्या पेंशन खात्यातून ९७००० हजारावर हात साफ केला. पवई पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईकर ६० वर्षीय दत्ताराम मालपेकर एका खाजगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. सरकारी अधिसूचनांद्वारे पेन्शन जमा होणाऱ्या बँकेला ठराविक कालावधीनंतर जीवन प्रमाण पत्र सादर करावे लागते. १५ नोव्हेंबर रोजी मालपेकर याना आपल्या बँकेची विक्रोळी येथील शाखा घाटकोपर येथे हलविण्यात आली असल्याची माहिती मिळाली.
मला शाखेचा घाटकोपर येथील नवीन पत्ता माहित नव्हता,त्यामुळे मी त्याला ऑनलाइन शोधण्याचा निर्णय घेतला. पत्त्यासह एक संपर्क क्रमांक होता, पत्त्याबाबत खात्री करून घेण्यासाठी मी त्यावर कॉल केला. समोरच्या व्यक्तीने स्वत:ची ओळख शाखेतील अधिकारी म्हणून करून देत, मला काय हवे ते विचारले. मला माझे जीवन प्रमाणपत्र सादर करायचे आहे, तेव्हा तो म्हणाला की हे ऑनलाइन केले जाऊ शकते आणि मला माझ्या खात्याच्या तपशील विचारून घेतला, असे पवई पोलिसांना दिलेल्या जवाबात मालपेकर यांनी म्हटले आहे.
त्या खात्यात फक्त चार हजार रुपयाच्या आसपास रक्कम शिल्लक असल्याचे लक्षात येताच समोरील व्यक्तीने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांचे अजून कोणते अकाउंट आहे का याची विचारणा केली. त्यांना खात्री देत दुसऱ्या बचत खात्याचा सर्व संवेदनशील तपशील जाणून घेतला. काही वेळाने तुमचे काम लवकरच होईल असे सांगून फोन ठेवून दिला. ‘काही वेळाने माझ्या बचत खात्यातून पैसे काढल्याबद्दल संदेश मोबाईलवर प्राप्त झाल्यावर कोणीतरी तिऱ्हाईत व्यक्तीने माझे खात्यातून पैसे काढून माझी फसवणूक केल्याचे लक्षात आले’ असेही पोलिसांना दिलेल्या जवाबात त्यांनी म्हटले आहे. काही मिनिटांतच मालपेकरांच्या बचत खात्यातून ₹ ९७,००० इतर खात्यांमध्ये हस्तांतरीत करण्यात आले होते.
याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आरोपीद्वारे वापरलेला क्रमांक गुरूग्राममध्ये नोंदवला गेला आहे. ज्या खात्यात रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे ते जम्मूमधील पर्यटन आणि प्रवास एजन्सीच्या नावावर आहे.’
‘सायबर गुन्ह्यासाठी एक सामान्य बाब आहे, जिथे राज्याच्या सिमा ओलांडून पैसे दूरच्या राज्यांत खात्यांमध्ये हस्तांतरीत केले जातात. त्यानंतर ते वेगवेगळ्या खात्यांमधून मास्टरमाइंडकडे हस्तांतरित केले जातात, किंवा रोख पैसे काढले जातात आणि पैशाच्या हस्तांतरणाचे पुढील मार्ग बंद करून तपासाच्या मार्गात दिशाभूल निर्माण केली जाते’ असेही एका सायबर क्राइम तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.