हिरानंदानी, पवई परिसरात पाठीमागील आठवड्यात घडलेल्या दोन गंभीर घटनेनंतर हेरीटेज गार्डन, एवलोन परिसरात पुन्हा पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्तांच्या अखत्यारीतील विशेष पोलीस पथकाला या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. लवकरच या परिसरात नवीन बीट चौकी देखील बनवण्यात येणार असून, संपूर्ण पोलीस पथक येथे कार्यरत असणार आहे.
पवईतील हिरानंदानी परिसरात महाविद्यालयीन मुलांचा रस्त्यांवर, खाण्याच्या ठिकाणांवर असणारा धुडगूस. रस्त्यांवर तरुणांच्या भरधाव पळणाऱ्या मोटारसायकली, तरुणांमधील भांडणे असे अनेक कायदा सुव्यवस्थेशी निगडीत गोष्टी सतत घडत असतात. त्यामुळे या परिसरात पोलिसांची सतत गस्त ठेवण्यात यावी अशी मागणी हिरानंदानी रहिवाशी आणि समितीतर्फे करण्यात येत आहे. आवर्तन पवईने देखील हा मुद्दा लावून धरला होता.
हिरानंदानी परिसर हा पवई पोलिसांच्या आयआयटी बीट चौकीच्या अखत्यारीत येतो. येथील बीट मार्शल या परिसरात गस्त घालतात, मात्र ते निघून जाताच परिसरात तरुणाईचा धुडगूस पुन्हा सुरु होतो. जे पाहता नागरिकांच्या मागणीस्तव एक पोलीस पथक हिरानंदानी येथील डी मार्ट आणि हेरीटेज उद्यान परिसरात तैनात करण्यात आले होते. त्यामुळे बराच फरक जाणवत होता. कायदा मोडणाऱ्यावर पोलिसांचा वचक होता, मात्र काही दिवसांपूर्वी हे पथक येथून हटवण्यात आले आणि पुन्हा समस्या उद्भवू लागल्या आहेत.
हिरानंदानी परिसरात विकासकाकडून खाजगी सुरक्षा रक्षकांची एक स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) तैनात असते. यातील कर्मचारी परिसरात गस्त घालतात. मात्र त्यांच्याकडे विशेष अधिकार नसल्याने कायदा सुव्यवस्थेशी निगडीत समस्या सोडवण्यासाठी उपयोगात येत नाही.
पाठीमागील आठवड्यात एक ज्येष्ठ नागरिकाच्या कारला दोन तरुणांनी मोटारसायकलने धडक देवून पुन्हा त्याच्याशी वाद घालत त्याला मारहाण केल्याची घटना ग्लेन गेट इमारतीजवळ घडली होती. तसेच एक १७ वर्षीय विधी संघर्षित बालकाने २ तरुणांवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना देखील घडली आहे. जे पाहता बुधवार रात्रीपासून पुन्हा एक पोलीस पथक या परिसरात तैनात करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्तांच्या अखत्यारीतील विशेष पथकाला (डेल्टा १०) येथे तैनात करण्यात आले आहे. यात उपायुक्तांच्या नियंत्रणात असणाऱ्या सर्व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश आहे. ६ ते ८ जणांचे हे पथक असणार आहे. जे परिसरात पायी गस्त घालून उपद्रव निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई करेल.
पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधान सावंत यांनी याला दुजोरा देतानाच बुधवार रात्रीपासून हे पथक येथे दाखल झाल्याचे सांगितले.
या परिसरात एक नवीन स्वतंत्र बीट देखील उभी राहणार असून, या बीटच्या मंजुरीचे काम अंतिम टप्यात आहे. त्यामुळे लवकरच पूर्ण टीमच या परिसरासाठी रुजू होणार आहे. त्यामुळे या परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच परिसरातील समस्या सोडवण्यासाठी आता याच परिसरात सोय उपलब्ध होत आहे.
No comments yet.