जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर भरधाव वेगात धावणारा एक ट्रेलर आयआयटी पवई येथील मारुती मंदिरामध्ये घुसल्याची घटना (आज) रविवारी रात्री ३.३० वाजता घडली. या घटनेत मंदिराचा मंडपासह परिसरात असणारे एक जुने झाड आणि मूळ गाभाऱ्याची उजव्या बाजूची भिंत पडून मोठे नुकसान झाले आहे. ट्रेलर चालक जमादार मोहम्मद अली (४०) याला पवई पोलिसांनी अटक केली आहे.
घटना घडली तेव्हा मंदिर परिसरात चार इसम झोपले होते, मात्र या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील एक इसम तर घटनेतून आश्चर्यकारक रित्या वाचला असल्याचे काही प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
“एमएच ४५ एच २६०५ क्रमांकाचा ट्रेलर बांधकामासाठी लागणाऱ्या सळई घेवून गांधीनगरकडून जोगेश्वरीच्या दिशेने जात असताना आयआयटी येथे त्याचा चालक जमादार याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे मंदिर परिसरात असणाऱ्या दुभाजकाला टक्कर मारून ट्रेलर सरळ मंदिराच्या परिसरात घुसला. या घटनेत मंदिराच्या समोर असणारे झाड, मंदिरासमोरील मंडप आणि मंदिराच्या गाभाऱ्याची एक भिंत पडली आहे.” असे याबाबत सांगताना पवई पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी सांगितले.
“आम्ही चालक जमादार मोहमद अली याला अटक केली असून, त्याला उद्या कोर्टात हजार केले जाईल. घटनेनंतर ट्रेलरचा मालकाने संपूर्ण घटनेची जबाबदारी स्वीकारत मंदिराच्या झालेल्या नुकसानीसाठी मंदिराचा भाग पुन्हा बांधून देणार असल्याचे सांगितले.” असेही एका अधिकाऱ्याने यावेळी बोलताना सांगितले.
No comments yet.