वाहतूकीच्या नियमांची पायमल्ली करणारे मुंबईत पदोपदी पहायला मिळतात. मात्र त्यांच्या या कृत्यामुळे इतर प्रवाशांना नाहक त्रास होत असतो याचे मात्र त्यांना भान नसते. अशाच प्रकारे पवई येथील जलवायू विहार भागात रस्त्यांवर वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांचा व्हिडीओ पवईकर अभिनेते जितेंद्र जोशी यांनी मुंबई पोलीस यांना ट्विट करत तक्रार केली आहे.
ट्विटमध्ये त्यांनी मुंबई वाहतूक पोलीस आणि मुंबई पोलिसांना टॅग केले आहे. ज्याच्या प्रती उत्तरात मुंबई पोलिसांनी तत्काळ जितेंद्र जोशी यांना प्रतिसाद दिला आहे. जोशी यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना नेमक्या ठिकाणाची माहिती देखील ट्विटरद्वारे मागवत साकीनाका वाहतूक विभागाला याची माहिती दिली असल्याचे म्हटले आहे.
हा व्हिडीओ पवई परिसरातील जलवायू विहार आणि म्हाडा वसाहत येथील मार्गावरील असून, अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनचालक विरुद्ध दिशेने गाड्या चालवताना दिसत आहेत.
मेट्रो ६ प्रकल्पाच्या कामामुळे पवईत पाठीमागील काही महिन्यात वाहतूक कोंडी वाढली आहे. सकाळी दुपारी येथील शाळेजवळ बेजबाबदारपणे उभ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत चांगलीच भर पडत असते. यातच काही वाहनचालक वाहतूक थांबताच दुभाजक ओलांडत विरुद्ध दिशेने वाहने चालवत दुसऱ्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अडथला निर्माण करत संपूर्ण परिसरच कोंडीच्या विळख्यात टाकतात.
“वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक पोलीस ठिकठिकाणी कार्यरत असतात. यावेळी वाहतूक नियमांना मोडणाऱ्या वाहनचालकांवर आमच्याकडून कारवाई केली जाते. मात्र प्रत्येक मार्गावर वाहतूक पोलीस तैनात करणे शक्य नाही. अशावेळी नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास वाहतूक कोंडी टळू शकते, मात्र काही वाहनचालक सरार्सपणे नियमांची पायमल्ली करत असल्याने त्याचा इतर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो,” असे याबाबत बोलताना वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले.
पवईतील रस्त्यांवर बेजबाबदारपणे पार्क आणि वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनांमुळे अनेक प्रवाशांना याचा नाहक त्रास होत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या जात असतात, मात्र यात काही विशेष बदल घडताना दिसत नाहीत. अभिनेते जितेंद्र जोशी यांचे अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यात सुद्धा विशेष योगदान आहे. अशात त्यांनी केलेल्या या तक्रारीनंतर तरी वाहतूक पोलीस काही ठोस पाऊले उचलते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Breaking tools at powai @MumbaiPolice @mtptraffic pic.twitter.com/v8R1d2cce1
— Jitendra shakuntala Joshi (@jitendrajoshi27) July 30, 2019
No comments yet.