साकीनाका पोलिसांची मेहनत आणि रिक्षावाल्याच्या प्रामाणिकपणामुळे एका महिलेला आपली रिक्षात विसरलेली पैसे, दागिन्यांची बॅग परत मिळाली आहे. याबाबत महिलेने आपला आनंद आणि कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
साकीनाका परिसरात राहणारी महिला आपल्या काही कामानिमित्त बाहेर रिक्षातून प्रवास करत असताना त्यांची सोन्याचे दागिने, रोख रक्कम, क्रेडिट कार्ड आणि मोबाईल असलेली बॅग चूकभूलीने असल्फा मेट्रो स्टेशनजवळ रिक्षात विसरल्या. काही वेळाने त्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी आसपासच्या परिसरात रिक्षावाल्याचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही.
महिला आणि त्यांचे भाऊ यांनी संपूर्ण नारायण नगर, असल्फा परिसरात रिक्षाचा शोध घेतला मात्र काहीच माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.
साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास काकडे व पोलीस निरीक्षक अर्जुन कुडले यांनी त्वरित पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत संबंधित रिक्षाचा शोध सुरु केला. रिक्षाचा शोध सुरु असतानाच जावेद इम्तियाज शेख नामक रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखवत साकीनाका पोलिसांशी संपर्क साधत रिक्षात मिळालेली ती बॅग पोलीस ठाण्यात जमा केली.
आपली बॅग परत मिळाल्याचा आनंद व्यक्त करतानाच माणसातली माणुसकी अस्तित्वात असल्याचे समाधान व्यक्त करत जावेद यांचे आभार मानले.
No comments yet.