पवईत १० फूट खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जखमी

डावीकडे – खड्ड्यात पडलेली मोटारसायकल, उजवीकडे – जखमी हिरेन कानोजिया

रस्त्यावरून जात असताना अचानक समोर आलेल्या मुलाला वाचवण्यासाठी ब्रेक लावताच १० फूट खड्ड्यात पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना पवईमध्ये घडली आहे. पवई महात्मा फुलेनगर भागात ही घटना घडली. हिरेन कानोजिया (३५) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. हिरेनवर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हिरेनला झालेल्या जखमा आणि फ्रॅक्चरवर उपचार करण्यासाठी त्याच्यावर तीन ते चार शस्त्रक्रिया कराव्या लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले.

यासंदर्भात हिरेन याच्या परिवाराने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तो आपल्या मोटारसायकलने कामानिमित्त बाहेर निघाला होता. रस्त्याच्या उतारावरून तो खाली उतरत असताना अचानक त्याच्या दुचाकीसमोर एक लहान मुलगा आल्याने मुलाला वाचवण्यासाठी त्याने ब्रेक लावले. मात्र ब्रेक लावताच मोटारसायकलसह तो रस्त्याच्या बाजूलाच खोदलेल्या १० ते १२ फूट खोल खड्ड्यात जावून पडला.

रस्त्यावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी मदत करण्यासाठी धाव घेत त्याला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले. खड्ड्यात पडल्यानंतर सुरुवातीला काही काळ तो बेशुद्धच होता. प्राथमिक उपचारानंतर त्याच्या संपूर्ण शरीरावर अनेक जखमा असल्याचे डॉक्टरांना आढळले. त्याच्या डाव्या आणि उजव्या हाताला दोन फ्रॅक्चर आहेत तसेच डाव्या मनगटावर अनेक फ्रॅक्चर आहेत. हिरेन याने हेल्मेट घातलेले असल्याने त्याच्या डोक्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना हिरेनच्या परिवाराने सांगितले कि, “कंत्राटदाराने खड्ड्याभोवती कोणतीही सुरक्षा जाळी किंवा धोक्याचे फलक लावले नाहीत. खड्ड्याच्या परिसरात काही बॅरिकेड्स लावलेले असते तर हिरेन खड्ड्यात पडला नसता.”

दरम्‍यान भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून सुरक्षा जाळी, किंवा पत्रे लावून कंत्राटदाराने काम करावे. तसेच जखमी तरुणाच्या उपचाराचा खर्च कंत्राटदाराने करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!