पवईतून अल्पवयीन मुलाचे अपहरण; मुंबई पोलिसांच्या ‘लिओ’ श्वानाने ३ तासात काढले शोधून

पवईतून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलाला मुंबई पोलिसांच्या लियो या प्रशिक्षित पोलिस स्निफर डॉगने (श्वानाने) अवघ्या तीन तासात शोधून काढले. अपहरण झालेल्या ६ वर्षाच्या मुलाच्या पालकांनी मध्यरात्री पवई पोलिसांकडे मदत मागितल्यानंतर परिसरात सीसीटीव्ही नसल्याने पवई पोलिसांनी पोलीस श्वानाची मदत घेत साडेतीन तासात मुलाची सुटका केली.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा रात्री घराजवळ खेळत होता. उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने त्याचे आई-वडील आणि ११ वर्षांच्या बहिणीने त्याचा शोध सुरू केला मात्र तो मिळून आला नाही. “मुलगा कुठेच मिळून न आल्याने त्याच्या आई-वडिलांनी पवई पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली,” असे पोलिसांनी सांगितले.

घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वात पवई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील, पोलीस निरीक्षक विजय दळवी, सहायक पोलीस निरीक्षक विनोद लाड, पोलीस उपनिरीक्षक नितीन गायकवाड आणि गुन्हे प्रकटीकरण पथक यांच्या मदतीने विविध पथके तयार करून मुलाची बहिण आणि पालकांच्या मदतीने शोध सुरु केला.

“आम्ही परिसरात चौकशी सुरु करून मुंबई आणि मुंबई बाहेरील सर्व पोलीस ठाण्यांना मुलाची माहिती पाठवली होती. अपहरण झालेला भाग हा झोपडपट्टी सदृश्य परिसर असल्याने कुठेच सीसीटीव्ही नव्हते. त्यामुळे आम्ही मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोध पथकाच्या स्निफर डॉगची मदत घेण्याचे ठरवले.” असे पवई पोलीस ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

प्रशिक्षित पोलिस श्वान लिओ याला मुलाने दिवसा घातलेल्या कपड्यांचा वास देण्यात आला. वासाच्या आधारावर परिसरात धावपळ करत लिओने मुलाचा माग काढत काही वेळातच त्याला शोधून काढले.

“अपहरणकर्त्याने मुलाला घरापासून ५०० मीटर अंतरावर अशोक नगर भागात एका मोकळ्या मैदानात सोडले होते. आम्ही मुलाकडून अपहरणकर्त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलगा घाबरलेला असल्याने तो काहीही सांगू शकला नाही. तो फक्त एवढाच म्हणाल की, मला एका काकांनी नेले होते” असे पोलिसांनी सांगितले.

यासंदर्भात पवई पोलिस अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!