पवई तलावात सोडले जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) अखेर सल्लागार सापडला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी टंडन अर्बन सोल्युशन्स या सल्लागाराची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला पाठीमागील आठवड्यात मंजुरी दिली आहे. कंपनी येत्या ६ महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्यानंतर सांडपाण्याचा प्रवाह वळवण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. कंपनीशी सल्लामसलत करण्यासाठी पालिका ६७.८० लाख रुपये खर्च करणार आहे.
प्रस्तावानुसार, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (National Green Tribunal) ७ मार्च २०२२ रोजी पवई तलावात सांडपाणी सोडण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दिले होते. यानंतर जुलै महिन्यात पालिकेतर्फे तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यास सल्लागार नेमण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. तथापि, योग्य उमेदवार मिळून आला नसल्याने १४ सप्टेंबरला पुन्हा निविदा मागविण्यात आल्या.
काही वर्षांपूर्वी केलेल्या अभ्यासानुसार शहरातील तलावांमध्ये दररोज १०.९ दशलक्ष लिटर सांडपाणी सोडले जात होते. पवई तलावात प्रक्रिया न केलेले सांडपाणी जाणारे १५ प्रवेश आहेत. या सगळ्यांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी अखेर पालिकेला सल्लागार सापडला असून, पवई तलाव सांडपाणी मुक्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार, सल्लागाराने पवई तलावात सोडले जाणारे / प्रवेश करणारे सांडपाणी थांबवण्यासाठी आणि त्यावर उपाय करण्यासाठी सविस्तर अहवाल तयार करणे आवश्यक आहे. यामध्ये जमिनीवरून वाहणारे पावसाचे पाणी जवळच्या नगरपालिका गटारांकडे वळवणे समाविष्ट आहे. अहवाल तयार झाल्यानंतर पालिका तलावामध्ये प्रवेश करणारे सांडपाणी वळवण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करेल.
No comments yet.