पवई तलावात बोट उलटून ८ जण बुडाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यातील ५ जणांना वाचवण्यात स्थानिक आणि अग्निशमन दलाला यश आले आहे. तर ३ जणांचा शोध शनिवारी संध्याकाळ पर्यंत चालूच होता. बुडालेले सर्व हे मुंबईतील विविध भागातील रहिवाशी असून, पवई तलावातील हाउस बोटवर पार्टी करण्यासाठी आले होते. या घटनेवरून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे की पवई तलावात चोरून पार्टी चालतात. याबाबत पोलिसांनी संबंधित प्रशासनावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पर्यावरणवादी संस्था करत आहेत.
बुडालेल्या ८ जणांपैकी नरेश मधुकर ठाकूर (४६), दिपक तुकाराम पाटील (२४), परेश भिकूबाई पांचोळे (३४), कुणाल भालचंद्र पाटील आणि अबू मंडल (२१) यांना वाचवण्यात यश आले आहे. तर दिनेश यशवंत भोईर (३४), रसूल खान (४३), आतिफ लतीफ खान (२२) यांचा शोध सुरु आहे.
याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पवई तलावात असणाऱ्या हाउस बोटवर काही तरून पार्टी करण्यासाठी आले होते. त्यांना घेवून जाणारी बोट पलटी झाल्याने मुख्य गणेशघाटापासून ५० ते ६० मीटर अंतरावर ते पाण्यात पडले. पाण्यात पडलेल्या ८ जणांपैकी ५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. उरलेल्या ३ जणांचा काही पत्ता लागू शकलेला नसून, एनडीआरएफ, नौदल (नेव्ही) आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आमचे शोधकार्य चालू आहे.
वाचवलेल्या तरुणांनी पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार, पार्टीसाठी आलेल्या काही मित्रांना बोटीतून घेवून जात असताना, तलावात असणाऱ्या सळईला धडकल्याने बोटीचे संतुलन बिघडले आणि बोट पलटी झाली.
शनिवारी संध्याकाळपर्यंत एनडीआरएफ, नौदल आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोध कार्य चालू होते. मात्र, बुडालेल्या ३ जणांचा काहीच पत्ता लागला नव्हता. अखेर पाणबुड्यांना बचावकार्यासाठी बोलावण्यात आले असून, शेवटची माहिती हाती आली तेव्हा पर्यंत बचावकार्य चालूच होते.
यासंदर्भात आवर्तन पवईशी बोलताना पर्यावरणवादी संस्था पॉज मुंबईच्या सुनिष सुब्रामण्यम कुंजू यांनी सांगितले “आम्ही अंग्लिंग क्लबला सीमा निर्धारित करण्यात याव्यात. त्यांचे कार्य नियंत्रित असावे अशा मागण्या आधीच केल्या आहेत. याच्यावर अंमलबजावणी केली असती तर घटना टळली असती.”
कुंजू पुढे म्हणाले “पवई तलावात रात्रीच्या वेळेस हाऊस बोटींवर अनधिकृतरित्या बडे लोक पार्ट्या करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. बिएमसीने कारवाई करून मोठ़्या प्रमाणात हाऊस बोट सील केल्या आहेत. तरीही चोरून हाऊस बोटींवर पार्टी सुरू आहेत हे या घटनेतून स्पष्ट होते. हाऊस बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त लोक होती. आठ लोक या हाऊस बोटीवर दारू पार्टी करत होती.”
“हाउस बोटवर फक्त महाराष्ट्र अंग्लिंग क्लबचे मेंबर असणाऱ्यांना जाण्याची अनुमती असते. बुडालेले तरुण क्लबचे मेंबर होते का? त्यांनी आवश्यक अनुमती घेतल्या / मिळवल्या होत्या का? पार्टीसाठी कोणी अनुमती दिली? याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे.” असे याबाबत बोलताना संस्थेच्या जनसंपर्क अधिकारी निशा कुंजू यांनी सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.