शुक्रवारी, २५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पवईतील एल अँड टी कंपनीजवळ एक सिमेंट मिक्सर पलटी झाल्याची घटना घडली. पवईकडून गांधीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर हा कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास २ तासानंतर क्रेनच्या मदतीने मिक्सर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही.
यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी गांधीनगर पूर्व दृतगती मार्गाकडे जाणारा एक सिमेंट मिक्सर एलअंडटी कंपनीजवळ घसरल्याची घटना घडली. सिमेंट मिक्सर क्रमांक एमएच ४८ एवाय ९७१७ हा सिप्झकडून जेविएलआरमार्गे पूर्व दृतगती मार्गाकडे चालला होता. “एलअंडटी कंपनीजवळ आल्यावर मिक्सर चालकाचा ताबा सुटल्याने मिक्सर पलटी होत रस्त्यावर आडवा झाला. सुदैवाने कंटेनर चालक आणि क्लिनर वेळीच बाहेर पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत.” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
मिक्सर चाकरमान्यांच्या प्रवासाच्या वेळीच उलटला असल्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले होते. जवळपास २ तास हा मिक्सर रस्त्यावरच पडून असल्याने गांधीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. क्रेनच्या साहय्याने रस्त्यावर आडवा झालेला हा कंटेनर हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
No comments yet.