चांदिवलीत १४ वर्षीय मुलाने भरधाव कार चालवत वृद्धाला उडवले

चांदिवली, नहार अमृत शक्ती परिसरात एका १४ वर्षीय मुलाने आपल्या पालकांची गाडी बेफाम चालवत एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एक एसयूव्ही कार इमारतीच्या बाहेर निघून, रस्त्याने चालत असताना ज्येष्ठ नागरिकाला धडकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मुलगा त्याच्या पालकांची एसयूव्ही चालवत असल्याची माहिती समोर येत आहे.

यासंदर्भात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मुलाच्या पालकांवर कारवाई करत २५ हजार रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर मुलाची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

चांदिवलीतील नहार अमृत शक्ती येथील एका इमारतीच्या गेटमधून एक ज्येष्ठ नागरिक बाहेर पडत रस्त्यावरून फेरफटका  घेण्यास निघाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. याचवेळी त्याच इमारतीच्या गेटमधून एक एसयूव्ही कार बाहेर निघताना दिसत आहे.

बाहेर निघताच रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्यासोबत होणारी धडक रोखण्याच्या प्रयत्नात इमारतीच्या बाहेर उभ्या एका ऑटोरिक्षाला धडक देवून ती कार पुढे चालत असणाऱ्या वृद्धास धडक देताना दिसत आहे. वृद्ध व्यक्तीला धडक दिल्यानंतर कार भरधाव वेगात अनियंत्रित अवस्थेत तेथून पळ काढताना दिसत आहे.

या अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने त्यांना पुढील काही दिवस पूर्ण बेडरेस्टचा सल्ला दिला असल्याची माहिती मिळत आहे.

यासंदर्भात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या पालकांवर कारवाई करत २५ हजार रुपयांचा दंड ठोठावून मुलाची सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणानंतर चांदिवलीकर खूपच नाराज असून, फुटपाथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना रस्त्याने चालावे लागत असून, अपघातांचे प्रमाण वाढले असल्याची चिंता व्यक्त केली. तसेच पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवायला देत असून, अशा पालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता कठोर कारवाई करण्याची मागणी चांदिवलीकरांकडून होत आहे.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!