पाठीमागील २ महिन्यांपासून चांदिवली फार्म रोडवर शिवाजी चौक ते पश्मीना हिल भागात सुरु असणारे रोड निर्मितीचे काम संपतच नाही. गेले महिनाभर फक्त कलवट निर्मितीच्या कामात हा रस्ता अडकून पडला आहे. यामुळे चांदिवलीकरांना हिरानंदानीच्या दिशेने जाण्यास आणि येण्यास एकमेव डीपी रोड ९ हा पर्याय उरल्याने चांगलीच कोंडी झाली आहे.
बुधवारी चांदिवली रेसिडेंट वेल्फेअर असोसिअशनचे मनदीप सिंग आणि सदस्यांनी या रस्ता निर्मितीच्या कामाच्या ठिकाणी भेट देवून कंत्राटदार याच्याशी चर्चा करून लवकरात लवकर काम पूर्ण करून किमान एक मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली.
मुंबई महानगर पालिकेच्या योजने अंतर्गत मुंबईत पालिकेतर्फे ३२ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये पवई आणि चांदिवली येथील रस्त्यांचा देखील समावेश आहे. चांदिवली फार्म रोडवरील शिवाजी महाराज चौक ते पश्मीना हिल या भागात सुरु असणारे काम हे देखील त्यातील एक आहे.
या भागात काम सुरु होऊन जवळपास २ महिन्यापेक्षा जात काळ उलटला आहे. या कालावधीत चांदिवलीकडून पश्मीना हिलकडे जाणाऱ्या मार्गावर आयआरबी कॉम्प्लेक्स समोरील काही भाग वगळता संपूर्ण भागात सिमेंट कॉक्रीट रस्ता बनून तयार आहे. मात्र पाठीमागील महिनाभरापासून या मार्गावर असणाऱ्या चाळ सदृश्य वस्तीजवळ कलवट बनवण्याच्या नावाखाली काम रखडून पडलेले असून, रस्ता वाहतुकीसाठी अजूनही खुला झालेला नाही.
“वाहतूक पोलिसांच्या नोटीसीनुसार या रस्त्याच्या निर्मितीच्या कामावेळी एका बाजूची वाहतूक बंद ठेवून काम सुरु करून दुसऱ्या बाजूची वाहतूक खुली ठेवण्याच्या सूचना आहेत. तरीही कंत्राटदाराने संपूर्ण रस्ता बंद करून वाहतुकीचा बट्याबोळ केला आहे,” असे यासंदर्भात बोलताना चांदिवलीकरांनी सांगितले.
चांदिवली फार्म रोड हा शिवभक्तानी मार्गे चांदिवली आणि हिरानंदानीला जोडणारा महत्वाचा दुवा आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी, कामावर येणारे लोक आणि रहिवाशी यांची मोठी वर्दळ या मार्गावरून होते. मात्र पाठीमागील २ महिन्यांपासून हा रस्ता बंद पडल्याने या सगळ्यांची चांगलीच दैना झाली आहे.
नागरिकांच्या होणाऱ्या अडचणीला पाहता चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशनचे मनदीप सिंग यांनी बुधवारी या परिसरातील कामाची पाहणी केली. यावेळी कंत्राटदार याच्याकडून कामाची स्थिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी सुरु असणारे कलवट आणि हिरानंदानीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उरलेल्या कामाची लवकरात लवकर पूर्तता करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली.
याबाबत सकारात्मक प्रतिसाद देताना कंत्राटदाराने येत्या १० – १२ दिवसात एका बाजूचे काम पूर्ण करून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले. तसेच दुसऱ्या मार्गावर सध्या केबल आणि पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. ते पूर्ण होता रोडच्या निर्मितीच्या कामाला सुरुवात करून कामाच्या डेडलाईन पूर्वी हे काम पूर्ण करण्याचे देखील आश्वासन दिले.
No comments yet.