कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत पर्यटनासाठी निघालेल्या साकीनाका येथील काही जणांना आकर्षक टूर पॅकेजच्या बहाण्याने २ लाख ३५ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. साकीनाका पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकीनाका, काजूपाडा येथे राहणारे आणि औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीत काम करणारे सदादूर पाल आपले मित्र आणि कुटुंबियांसोबत मसुरी, नैनिताल या ठिकाणी फिरण्यासाठी निघाले होते. यासाठी त्यांनी इंटरनेटवर पॅकेज टूर देणाऱ्या कंपन्यांचा शोध घेतला. एक नामांकित कंपनी यासाठी चांगले पॅकेज देत असल्याचे समोर येताच संकेतस्थळावर देण्यात आलेल्या संपर्क क्रमाकांवर पाल यांनी संपर्क साधला.
पंकज कुमार नामक प्रतिनिधीने त्यांना १७ जणांचे प्रवास, राहणे, खाणे-पिणे आणि फिरणे यासाठी साडेतीन लाखाचे पॅकेज दिले. सर्वानी या पॅकेजला संमती दर्शवत बुकिंगची मंजुरी दिली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विमान बुकिंग, हॉटेल बुकिंग आणि मंजुरीसाठी लागणारी रक्कम अशा विविध बहाण्यांच्या आधारे दोन लाख पस्तीस हजार इतकी रक्कम विविध खात्यांमध्ये भरण्यास सांगितली. रक्कम जमा झाल्यानंतर पाल यांनी सर्व बुकिंगच्या फोटो कॉपीची मागणी करताच पंकजने टाळाटाळीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या पंकजकुमारने काही दिवसांनी आपला मोबाइल बंद केला.
पंकजचा फोन लागत नसल्याने पाल यांनी विमान बुकिंग आणि हॉटेल बुकींगची शहानिशा केली असता, आधी बुकिंग करण्यात आले होते मात्र नंतर ते रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
फसवणुकीचा गुन्हा नोंद करून साकीनाका पोलिस पंकज कुमारचा शोध घेत आहेत.
No comments yet.