पवई पोलीस ठाण्यात किरकोळ वादातून तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदारांपैकी एका जोडप्याचा लग्नाचा वाढदिवस आहे, हे कर्तव्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच केक मागवून दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करत, दोघांच्यामधील वाद मिटवून समजूत घालून हसतमुखाने परतवले.
गुन्हेगारी आणि पोलीस यांचे अतूट नाते असते. पोलीस ठाण्यात केवळ चोरी, मारामारी, खून, बलात्कार, अत्याचार अशा घटनांचीच नोंद होत असते. मात्र गेल्या काही वर्षात पोलीस दलात रुजू असणाऱ्या अधिकाऱ्यांनी पोलिसांची ही प्रतिमा बदलत पोलीस जनतेचा मित्र आहे. पोलीस ठाण्यात केवळ तक्रारी दाखल केल्या जात नसून, लोकांच्या तक्रारी मैत्रीच्या नात्यातून मिटवता येतात हे सुद्धा दाखवून दिले आहे.
बुधवारी रात्री दोन मुलांमधील किरकोळ भांडणातून त्यांचे पालक एकमेकांविरोधात तक्रार नोंद करण्यासाठी पवई पोलीस ठाण्यात आले होते. दोन्ही पक्षातील वाद पोलीस अधिकाऱ्यांनी केवळ मैत्रीतून समजावून सोडवलाच नाही, तर त्याच दिवशी त्यापैकी एका दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस आहे हे कर्तव्यावर असणारे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल विसपुते, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब मोटे, महिला पोलीस अंमलदार मीना कांबळे आणि पोलीस हवालदार राजेंद्र ढोले यांच्या लक्षात येताच त्यांनी केक मागवून पोलीस ठाण्यात त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. ज्यानंतर दोन्ही पक्षाची समजूत घालून आनंददायी भावी आयुष्याच्या शुभेच्छा देत आनंदी चेहऱ्याने त्यांना घरी परतवले.
१५ फेब्रुवारीच्या रात्री जोडप्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण भरणाऱ्या या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह जनतेकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
V nice
छान कार्य ! अनपेक्षित पण त्या जोडप्यासाठी सुखद ! पोलिसांची प्रतिमा उजळवणारे कार्य !