पवईतील बेघर कुटुंबाच्या निवा-याची त्याच ठिकाणी सोय करा, नसीम खान यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पवईच्या जयभिम नगरमधील घरांवर बेकायदेशीर कारवाई करत जवळपास ६०० कुटुंबाना बेघर करण्यात आले आहे. या बेघर मागासवर्गीय कुटुंबांच्या निवा-याची सोय सरकारने त्याच ठिकाणी करावी अशी मागणी माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे.

खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत मागणीचे निवेदन पत्र दिले आहे. सर्व परिस्थितीचा विचार करून तसेच माणुसकीच्या दृष्टीकोनातून या कुटुंबियांची त्याच ठिकाणी निवा-याची सोय करावी अशी मागणी या पत्रामधून केली आहे.

६ जूनला महानगरपालिकेच्या एस विभागातील अधिकारी, पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक विकासक यांनी हिरानंदानी पवई येथील ६०० मागासवर्गीय कुटुंबियांची घरे नियमबाह्यपणे पोलिसी बळाचा वापर करून पाडली. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हजारो लोक बेघर झाले आहेत. त्यात महिला, विद्यार्थी, लहान मुले मुलींचाही समावेश असल्याचे पत्रात म्हटले आहे.

बेघर झालेले रहिवाशी हे अनेक वर्षापासून जयभिम नगर या ठिकाणी राहत होते. त्यांच्याकडे राहण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे आता हे सर्व लोक नाईलाजाने जिथे जागा मिळेल तिथे फुटपाथवर राहत आहेत. त्यातच पावसाळा सुरु झाल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच भर म्हणून पावसाळ्यातील साथींच्या रोगामुळे या लोकांच्या आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

रहिवाशांनी त्यांच्यावर झालेल्या अन्याया विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असून, हे सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्याची सुनावणी मंगळवार २५ जून रोजी आहे. तसेच या प्रकरणी नसीम खान, रहिवाशांचे शिष्टमंडळ आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेवून या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी केली होती. राज्यपाल यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन देखील दिलेले आहे.

शासनाने सर्व परिस्थितीचा विचार करून या कुटुंबियांची त्याच ठिकाणी निवा-याची सोय करावी अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!