मुंबईकरांसह डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनंतर आता ऑनफिल्ड राहून मुंबईकरांना कोरोनाची अपडेट देणारे मुंबईतील ५३ पत्रकार सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. पत्रकार, फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांचा यात समावेश आहे. या ५३ लोकांमध्ये पवईतील एका फोटोग्राफरचा सुद्धा समावेश आहे.
१६ एप्रिलला मुंबई पत्रकार संघाने महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यातून मुंबईतील पत्रकार, फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांच्या कोरोना चाचणीसाठी कॅम्पचे आयोजन केले होते. यावेळी १६७ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. याचे अहवाल (रिपोर्ट्स) येताच मुंबई आणि आसपासच्या परिसरातील ५३ पत्रकार कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.
पॉझिटीव्ह सापडलेल्या जास्तीत जास्त पत्रकार, फोटोग्राफर आणि कॅमेरामनना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, इतर काही जणांची चाचणी घेण्याची तयारी सुरु आहे.
मुंबईत सापडलेल्या या ५३ कोरोना पॉझिटीव्ह पत्रकारांमध्ये पवईमधील एका फोटोग्राफरचा सुद्धा समावेश आहे. “मला सकाळी पालिकेने फोनवर पत्ता विचारून घरातच अलगीकरणात राहण्याची सूचना केली. मला नक्की काय झाले आहे याची माहिती नव्हती पण अंदाज आला होता. थोड्या वेळाने पालिका ‘एस’ विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी थोडीफार माहिती देत, काही वेळातच मला त्यांनी जवळच असणाऱ्या अलगीकरण केंद्रात आणून ठेवले,” असे याबाबत बोलताना या फोटोग्राफरने सांगितले.
पालिकेच्या अलगीकरण केंद्रातील स्वच्छता आणि सुविधेबद्दल मात्र यावेळी त्याने नाराजी व्यक्त केली.
“आम्ही माहिती मिळताच कोरोना बाधित मिळालेल्या परिसराला पालिकेच्या मदतीने सील करून रहिवाशांना आवश्यक सूचना केल्या आहेत,” असे याबाबत बोलताना नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी सांगितले.
पवईतील या कोरोना बाधित रुग्णानंतर पवईतील कोरोना बाधितांची संख्या ११ वर पोहचली आहे. यापैकी ६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर ५ बाधितांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली.
कोरोना अपडेट २० एप्रिल २०२०
आज राज्यात कोरोनाबाधीत ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४६६६ झाली आहे. ६५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
No comments yet.