मुंबईतील पवई तलावाच्या परिसरात महापालिकेतर्फे बनवण्यात येणारे ‘मगर उद्यान’ मेट्रो प्रकल्पाच्या नियोजनामुळे तूर्तास लांबणीवर पडले आहे. पवई तलावाजवळून मेट्रोचा ट्रॅक जाणार असल्याने प्रस्तावित मगरीचे उद्यान तूर्तास लांबणीवर टाकण्यात आले आहे. या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदांना सुद्धा पालिकेने स्थगिती दिली आहे.
पवई तलावात गेल्या काही वर्षात प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. आसपासच्या निवासी संकुलांमधील घाण सांडपाणी तलावात सोडले जाते. उत्सवांच्या नावावर कचरा, निर्माल्य तलावात फेकले जाते. सोबतच मोठ्या प्रमाणात अवैध मासेमारीही चालते. ज्यामुळे तलावातील जलचरांसह, मगरींच्या जीविताला धोका पोहचवणारे वातावरण निर्माण झाल्यामुळे जलचरांसह मगरींची संख्या कमी होत चालली आहे.
जलचरांसह मगरींचे संवर्धन करण्यासोबतच त्यांच्यासाठी अनुकूल निवास निर्माण करण्यासाठी पालिकेने तलाव परिसरात मगरीचे उद्यान निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. तलाव प्रदूषणास कारणीभूत गोष्टी रोखत मगर उद्यानासह पर्यटन विकास केल्यास पवईच्या सौंदर्यात भर पडेल अशी सूचना प्रवीण छेडा यांनी मांडली होती. या सूचनेवर ठराव मंजूर होत पालिकेने सकारात्मक निर्णय घेत मासेमारी रोखण्यासह मगर उद्यान बनवण्याचा ठराव पास केला होता. मात्र पुढील काही वर्षात येथून जाणाऱ्या मेट्रो ६ प्रकल्पात येथील काही भाग बाधित होत असल्यामुळे प्रस्तावित मगरीचे उद्यान तूर्तास लांबणीवर टाकण्यात आले आहे.
मेट्रो सहा प्रकल्प आणि पवई तलाव
मुंबई मेट्रो प्रकल्पाचा भाग म्हणून लोखंडवाला-जोगेश्वरी-पवई-विक्रोळी-कांजुरमार्ग असा मेट्रो सहाचा कॉरीडोर निश्चित केला आहे. १४.४७ किमी लांबीचा हा पुरा कॉरीडोर असणार आहे. ज्यामध्ये १३ स्थानकांचा समावेश असेल. यातील पवईमधील एल-एंड-टी पासून आयआयटी मार्केट गेट या भागातून जेव्हीएलआरवरून ही मेट्रो जाणार आहे. यामध्ये पवई तलावाचा जवळपास २.५ किमीचा भाग येत असून, या प्रकल्पात तलावाचा काही भाग बाधित होणार असल्याची शक्यता आहे. यामुळेच तलाव सौंदर्यकरणासह मंजूर अनेक प्रकल्पांचे काम थांबवण्यात आले आहे.
No comments yet.