पाठीमागील आठवड्यात गणेशनगर विसर्जन घाटाजवळ पवई तलावात एक गाय मृत अवस्थेत आढळून आली होती. जवळपास चार दिवस ही गाय तलावातील पाण्यावर तरंगत होती. याची माहिती पालिकेला देवूनही पालिकेने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले होते. बरीच टाळाटाळ केल्यानंतर निसर्गप्रेमींचा वाढता दबाव लक्षात घेता अखेर रविवारी दुपारी ही गाय पालिकेच्या घनकचरा विभागाने कोरा केंद्राच्या साहय्याने बाहेर काढून नेली. मात्र जवळपास चार दिवस पाण्यात गाय मृतावस्थेत पडून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
पवई तलावात आणि परिसरात वाढलेल्या जलपर्णी पाहता भटकी जनावरे याठिकाणी चरण्यासाठी येत असतात. आयआयटी भागात पवई तलाव परिसरात चरायला आलेली अशीच गाय चरत असताना पाण्यात पडली. मेल्यानंतर ती तरंगत पवई तलाव गणेशनगर विसर्जन घाट येथे आल्यावर काही नागरिकांच्या समोर येताच त्यांनी याबाबत पालिकेला तक्रार दाखल केली. मात्र पालिकेने याकडे साफ दुर्लक्ष करत जवळपास चार दिवस ती गाई मृतावस्थेत पाण्यावर तरंगत राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
‘पालिकेने ती उचलून नेली असली तरी बरेच दिवस ती पाण्यात पडून राहिल्याने विषाणू तलावाच्या पाण्यात पसरून येथील पाणवनस्पती व जलचरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. एका बाजूला तलाव स्वच्छतेच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करायचे आणि दुसऱ्या बाजूला तलाव दूषित होण्यास कारणीभूत असलेल्या घटनांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे असे कामचूकारपणाचे धोरण पालिकेने अवलंबविल्याने येथे पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांवर सुद्धा त्याचा परिणाम होत आहे’ असे याबाबत बोलताना युथ पॉवर संघटनेचे मुंबई अध्यक्ष विरेंद्र धिवार यांनी सांगितले.
‘या घटनेबाबत त्वरित पालिका ‘एस’ विभागाच्या घनकचरा खात्याला मी लेखी तक्रार देवून कळवले असता, त्यांनी कोरा केंद्राशी संपर्क करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनीही याकडे दुर्लक्ष करत चालढकल केली,’ असे याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम कांबळे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच स्थानिक भाजपा नगरसेविका वैशाली पाटील यांनी तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबविले होते. त्यांना ही परिसरातील दुर्गंधीयुक्त परिस्थिती दिसली नाही का? असा सवाल काही स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
“एक पशू चार दिवस तलावात मृत अवस्थेत पडल्याची तक्रार करून देखील कुणीच कसे पुढे येत नाही? मेलेले जनावर तलाव पाण्यात अनेक दिवस पडून राहिल्याने तलावातील जलचरांना निश्चितच धोका निर्माण झाला आहे. याला पालिकेबरोबरच एक समाजाचा घटक म्हणून आपणही तेव्हढेच जबाबदार आहोत.” असेही यावेळी बोलताना धिवार यांनी सांगितले.
रविवारी या गाईला पाण्यातून बाहेर काढून नेण्यात आले असले तरी आता त्याला आठ दिवस उलटूनही परिसरात अजूनही दुर्गंधी पसरली आहे. पवई तलावात शनिवारी, रविवारी पर्यटकांची गर्दी उसळत असते मात्र परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे त्यांनी लांबच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे पालिकेच्या ढिसाळ, हलगर्जीपणाच्या स्वभाव आणि कामचूकारपणाच्या धोरणाबद्दल पालिकेच्या विरोधात तक्रार का दाखल होवू नये? असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे.
No comments yet.