दिवाळीनंतर मुंबईच्या रस्त्यांवर फोडलेल्या फटाक्यांचा खच हा प्रत्येक वर्षी पडलेला असतो. याच समस्येला लक्षात घेत समाजसेवक आणि पवई पोलीस ठाण्याचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पवई परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. पवई विभागात दिवाळी सणामध्ये फटाक्यांमुळे निर्माण झालेला कचरा साफ करत स्वच्छ प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश यावेळी देण्यात आला. पवई भागात महिलांना पुढाकार देणारे व त्यांच्या अडीअडचणीमध्ये मदतीचा हात पुढे करणाऱ्या जय मातादी महिला मंडळ अध्यक्षा श्रीमती रेखा सासवे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या.
२०२० ची दिवाळी ही कोरोनाच्या सावटाखाली असल्याने प्रशासनाकडून फटाकेमुक्त, सुरक्षित अंतर राखत दिव्यांनी उजळून निघणारी दिवाळी साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र लक्ष्मी पूजनाच्या एक दिवस काही काळासाठी सोम्या फटाके वाजवण्यास दिलेल्या परवानगीचा नागरिकांनी चांगलाच फायदा घेतला. यामुळे पवईतील अनेक परिसरात फुटलेल्या फटाक्यांचे कागद आणि इतर कचरा निर्माण झाला होता. जे पाहता आपल्या आयुष्यातील सुरुवातीचा काळ भारतीय वायू दलात आणि महाराष्ट्र पोलीस दलात व्यतित करणारे सुधाकर कांबळे यांनी पवई परिसरात ‘दिवाळी कचरा स्वच्छता अभियान’ राबवले.
“सुरुवातीपासूनच देशासाठी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा मनात धरून मी सैन्यदल आणि पोलीस दलात कार्यरत राहिलो. आता निवृत्तीनंतर हा वसा तसाच चालू ठेवणार आहे. शासकीय कार्यात असताना असणारी बंधने आता संपलेली आहेत. नागरिकांच्या समस्येसाठी आणि समाजाच्या हितासाठी आता इथून पुढे कार्य करायचे आहे,” असे यावेळी बोलताना कांबळे यांनी सांगितले.
No comments yet.