मुंबई महानगरपालिकेमार्फत पवई तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करत असताना पर्यावरणीय मापदंड राखले जावेत, यादृष्टिने पालिकेतर्फे पवई तलाव पर्यावरणीय मूल्यमापन संस्था नियुक्त केली जाणार आहे.
तलावात सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण, तलावाच्या भागातून नियोजित सायकल ट्रॅकच्या कामांसह विविध कारणांमुळे तलावाची होणारी हानी रोखण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी आपले आक्षेप नोंदवले आहेत. याचीच दखल घेत अखेर पालिकेने तलावाचे पुनरुज्जीवन व पर्यावरण मूल्यमापन करण्यासाठी एक संस्था नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
पर्यावरणीय पैलूंवर देखरेख करण्यासाठी आणि जैवविविधता वाढविण्यासाठी तज्ज्ञांची एक देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये नीरीचे माजी संचालक डॉ. राकेश कुमार, सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. दिपक आपटे, पवई तलाव संशोधक डॉ. प्रमोद साळसकर आणि हर्पेटोलॉजिस्ट केदार भिडे यांचा समावेश आहे.
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड रुंदीकरण, सौंदर्यकरण अशा विविध कारणाने पवई तलावाचा भाग कमी होत आहे. त्यातच आता नवनवीन प्रकल्प राबवत या तलावाचा भाग कमी करण्यासोबतच जनतेचा पैसा व्यर्थ केला जात आहे असा आरोपही पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे.
पर्यावरणीय मूल्यमापनात तज्ज्ञ सल्लागार समितीने सुचविलेल्या विविध संदर्भित अटींचा समावेश असेल. विविध संस्थांनी अभ्यास करुन बनविलेले अहवाल आणि संशोधन संकलित करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार समितीला सहाय्य करणे. पर्यावरणीय घटकांचे नमुने घेणे, जैवस्थिती निश्चित करणे, तलाव आणि त्याच्या सभोवतालचे सीमांकन (मॅपिंग) ठरवणे, सद्यस्थितीतील पर्यावरणीय गुणवत्तेचे मूल्यमापन करणे, तलाव परिसरात मानव आणि प्राणी दरम्यान संघर्ष रोखण्यासाठी योजना तयार करणे, पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी संकल्पना सुचविणे, तलावातील मगरी व इतर प्राण्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना सुचविणे इत्यादी जबाबदारी या संस्थेकडे सोपविण्यात येणार आहे.
No comments yet.