पवई तलावात मासेमारीला विरोध केल्याने सुरक्षारक्षकावर हल्ला


वई तलावात मासेमारी करण्यास विरोध दर्शवल्याने पवई येथील महाराष्ट्र स्टेट अँग्लिग असोसिएशनच्या पर्यवेक्षकासह सुरक्षारक्षकाला काही अज्ञात इसमांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. मध्यरात्री काही इसमांनी काठ्या घेवून क्लबच्या कार्यालयात घुसून हा हल्ला चढवला. यासंदर्भात पवई पोलिसांनी ७ जणांविरोधात भादवि कलम ३२४, ५०६, १४३, १४७, १४९ नुसार गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे.

तुंगागाव येथे राहणारे देवप्रकाश रामसेवक यादव (३५) यांना पवई तलाव येथे असणाऱ्या महाराष्ट्र स्टेट अँग्लिग असोसिएशनमध्ये सुरक्षा पर्यवेक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तलावात घुसखोरी करून होणारी मासेमारी रोखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. गुरुवारी तिथे सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे भरत गुप्ता यांनी तलावात मासेमारीसाठी जाळे टाकण्यात आल्याची माहिती त्यांना दिली होती. ज्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तेथील ६ जाळी ताब्यात घेतली होती.

एका ओळखीच्या इसमाने त्यांची भेट घेवून, तू महाराष्ट्र स्टेट अँग्लिग असोसिएशनचे कंत्राट घेतले आहेस का? अशी विचारणा केली. त्यावेळी त्या इसमासोबत तेथे आणखी ४ इसम होते. यादव याने होकार देताच, ‘यहॉ पे जो कोई कॉन्ट्रॅक्ट लेता है, वह आधा हिस्सा हमे देते है| तुमको भी आधा हिस्सा देना पडेगा, नही तो बोट पलटी करेंगे और पंगा होगा तो आपकी जिम्मेदारी है|’ अशी धमकी दिली. मात्र यादव यांनी १४ एप्रिलनंतर बोलू, असे सांगून तिथून निघून गेले.

शुक्रवारी रात्री गुप्ता तलावाची देखरेख करत असताना, रात्री साडेबाराच्या सुमारास हातात काठी घेवून आणि तोंडाला रुमाल बांधून ६ ते ७ इसम क्लबमध्ये घुसले आणि त्याला मारहाण सुरू केली. गुप्ताच्या बचावासाठी यादव पुढे सरसावताच त्यालाही जबर मारहाण केली. दोघांनाही साथीदारांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

“यादव यांच्या तक्रारीवरून आम्ही ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास करत आहोत” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

पवई पोलिसांनी घटनास्थळावरून सिसिटीव्ही फुटेज ताब्यात घेवून तपास सुरु केला आहे ‘मात्र हल्लेखोरांनी  आपले चेहरे रुमालांनी झाकले असल्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही’ असेही याबाबत बोलताना एका तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले “त्या रात्री यादव याने नावे सांगितलेल्या ३ तरुणांना आम्ही ताब्यात घेवून चौकशी केली मात्र त्यांचा या घटनेशी काहीच संबंध मिळून आला नाही.”

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!