कौटुंबिक वादातून जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोलीस शिपाई असणाऱ्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना १६ मार्चला पवई येथील गणेशनगर परिसरात घडली. हरिष गलांडे (४०) असे या मुलाचे नाव असून, घटनेनंतर पवई पोलिसांनी आरोपी वडील गुलाब गलांडे यांना अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना पुढील चौकशीसाठी २० मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात नियुक्त असणारा हरिष आपले आई – वडील, पत्नी आणि दोन मुलांसह पवईतील गणेशनगर परिसरात राहत होता. काही वर्षापूर्वी तो आर्थिक अडचणीत आला होता, तेव्हापासून अनेकवेळा तो नशेतच घरी येत असल्यामुळे घरातील व्यक्तींसोबत त्याचे नेहमीच खटके उडत असत.
सोमवारी सुद्धा हरिष नशेतच घरी आला आणि पत्नीशी वाद घालू लागला. “या वादाला थांबवण्यासाठी वडिलांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने वडिलांशीही वाद घालण्यास सुरुवात करत, बॉटल त्यांच्याकडे भिरकावल्याने त्याच रागात वडिलांनी जवळच पडलेला कोयता त्याच्या डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी केले” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
हरिषला रुग्णालयात दाखल केले असता दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
“घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी धाव घेत आरोपी वडील गुलाब गलांडे यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे” असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
No comments yet.