पवई, हिरानंदानीतील केसिंग्टन बिजनेस पार्कच्या तळमजल्यावर असणाऱ्या मीटर रूमला आग लागल्याची घटना आज (शुक्रवारी) घडली. दुपारी १. ४५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या ४ बंबांच्या साहय्याने १ तासानंतर संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग विझवण्याचे काम सुरु असताना विक्रोळी अग्निशमन विभागाचा एक कर्मचारी आगीच्या दाहामुळे किरकोळ जखमी झाला असून, उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास केसिंग्टन सेझ इमारतीतील काही कर्मचाऱ्यांना मीटर रूममधून धूर दिसत असल्याचे लक्षात येताच त्यांनी इमारत प्रशासनाला याबाबत माहिती दिली. वीजपुरवठा खंडित करत इमारतीत सुरु असणाऱ्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आल्यामुळे इमारतीच्या बाहेरील भागाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
इमारतीत असणाऱ्या अग्निसुरक्षा यंत्रणांच्या साहय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुंबई अग्निशमन दलाच्या ४ बंबांच्या साहय्याने १ तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
‘सध्या वातावरणात उष्णता वाढलेली आहे. मीटररूममध्ये सुद्धा वातावरणात उष्णता निर्माण झालेली असतानाच शॉर्टसर्किट निर्माण झाल्याने आग लागली असावी’ असे याबाबत बोलताना अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
‘आग विझवण्याचे काम सुरु असताना विक्रोळी अग्निशमन विभागाचे फायरमन संदिप हणमंत भोसले (३२) आगीचे दाह लागल्यामुळे किरकोळ जखमी झाले. त्यांना हिरानंदानी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे. असे याबाबत बोलताना एका बिट अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.