इंग्रजी दैनिकाच्या माजी पत्रकार महिलेने चांदिवली येथील नहार अमृत शक्ती येथील तुलीपिया इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून आपल्या ७ वर्षीय मुलासह उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. रेश्मा ट्रेंचिल (४४) असे या महिलेचे नाव असून, तिने लिहलेल्या सुसाईडच्या नोटच्या आधारावर साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंद करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, एप्रिल महिन्यात रेश्मा आपले पती सैराट मुलुकुटला आणि मुलगा गरुड यांच्यासोबत चांदिवली येथील या इमारतीत रहावयास आले होते. ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीत मोठ्या पदावर काम करणारे मुलुकुटला यांचे २३ मे रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या या अचानक जाण्याने रेश्मा यांना मोठा धक्का बसला होता. पती आणि सासरच्या लोकांच्या अंत्यसंस्कार, अंत्यदर्शनासाठी जाण्यास न मिळाल्याने ती नैराश्यात गेली होती.
“याच इमारतीत राहणाऱ्या एका कुटुंबियांशी त्यांचे सतत मतभेद होत असत. मुलगा नाचताना, खेळताना खूप आवाज करतो अशा विविध कारणांनी सोसायटी बोर्डाच्या सदस्यांजवळ त्यांच्याविरुध्द तक्रार केली होती. त्यांच्या या छळवणूकीला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
“मी रात्रपाळी कर्तव्यावर असताना रहिवाशांनी फोन करून गार्डन लॉबी भागात कोणीतरी पडले असल्याचे मला सांगितले. मी अजून दोन गार्डसह तिथे जावून पाहिले तर एक महिला आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मी त्वरित सोसायटी सदस्य आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली,” असे यासंदर्भात आवर्तन पवईशी बोलताना इमारतीच्या सुरक्षा सुपरवायजरने सांगितले.
सुसाईड नोटच्या आधारावर साकीनाका पोलिसांनी सदर कुटुंबाविरुद्ध गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास करत आहेत. घटनेनंतर झोनल डीसीपी महेश्वर रेड्डी आणि एसीपी अंधेरी विभाग यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील कारवाईची सूचना केली. “कुटुंबातील एका व्यक्तीला आम्ही ताब्यात घेतले आहे, चौकशीनंतर संबंधित कुटुंबाविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे यासंदर्भात बोलताना एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
“तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेल्या कुटुंबातील दोघे आजाराने त्रस्त आहेत. त्यांना विश्रांती करण्याची आवश्यकता असते. मुलगा घरात खेळताना, नाचताना मोठमोठ्याने आवाज करतो ज्यामुळे त्यांना त्रास होत असल्याने मानसिक त्रासाची त्यांनी पोलीस ठाण्यात दोन अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली होती. दोन्ही कुटुंबाला बोलवून समुपदेशन व सल्ला दिला होता जेणेकरून त्यांचे मतभेद दूर होतील,” असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
तिच्या कुटुंबातील सध्या येथे कोणीच नाही. तिचे सासू – सासरे आणि पती यांचा कोरोनामुळे वाराणसी येथे मे महिन्यात मृत्यू झाला आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी तिचा भाऊ अमेरिकेतून येत आहे, असे अधिकारी म्हणाले.
No comments yet.