व्यावसायिकाचे अपहरण करून ५ कोटीची खंडणी मागणाऱ्या ४ जणांना अटक

पवई स्थित व्यावसायिक भूषण अरोरा यांचे अपहरण करून त्यांच्या परिवाराकडे ५ कोटीची खंडणी मागणाऱ्या ४ जणांना पवई पोलिसांनी बेड्या ठोकत अरोरा यांची सुखरूप सुटका केली आहे. अमोल म्हात्रे (४१), निरंजन सिंग (३२), विधिचंद्र यादव (३१) आणि मोहम्मद सुलेमान (२०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघांवर भादवि कलम ३६४-ए (खंडणीसाठी अपहरण), ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४० वर्षीय भूषण अरोरा हे १७ जानेवारीला नेहमीप्रमाणे सकाळी कामासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र १८ तारखेला दुपारपर्यंत ते घरी परतले नसल्याने याबाबत त्यांच्या पत्नीने पवई पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती.

शोध सुरु असतानाच अरोरा यांच्या पत्नीने पवई पोलिसांना त्यांना एका अज्ञात इसमाने फोन करून त्यांच्या पतीला सोडण्यासाठी ५ कोटीच्या खंडणीची मागणी केली असल्याची माहिती दिली. “अज्ञात कॉलरने तो अरोरा यांचा मित्र असल्याचा दावा करतानाच ते त्याच्यासोबत सुरक्षित असल्याची खात्री दिली,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त परिमंडळ १० यांच्या नेतृत्वात १२ पथके तयार करून तपास सुरु करण्यात आला.

यासंदर्भात बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले की, “तपासादरम्यान असे दिसून आले की अपहरण झालेल्या आरोरा यांनी मोठा परतावा देण्याचे आश्वासन देऊन लोकांचे पैसे स्टॉकमध्ये गुंतवले होते. या लोकांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे परिसरातील त्याचे मित्र, कुटुंब, सहकारी इत्यादींचा समावेश आहे. परंतु स्टॉकमध्ये प्रचंड नुकसान झाल्याने त्यांना गुंतवणूकदारांचे पैसे परत करणे शक्य होत नव्हते. त्याच्यामुळे पैसे गुंतवलेल्या लोकांकडून त्यांना धमक्याही येत होत्या.”

दोन दिवसांनंतर, १९ जानेवारीला अरोरा यांच्या मोबाईल नंबरवरून फोन करून अपहरणकर्त्यांनी ५ कोटी तयार आहेत का? अशी त्यांच्या पत्नीकडे विचारणा केली. अपहरणकर्ते हे बस किंवा ट्रेनने विविध भागात प्रवास करून अरोरा यांचा नंबर वापरून फोन करत होते.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “आलेले फोन कॉल्सचे लोकेशन डिटेल्स मिळवत आरोपींचा शोध घेण्यासाठी पनवेल, नवी मुंबई आणि माथेरान भागात शोध मोहीम सुरू झाली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर कामोठे परिसरात सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले, आरोरा देखील सुझुकी इको मिनीव्हॅनमध्ये त्यांच्यासोबत पोलिसांना मिळून आले. अटक आरोपींच्या जवाबाच्या आधारावर आणखी दोघांना नवीमुंबई परिसरातून अटक करण्यात आले.”

ते पुढे म्हणाले, “आरोपींनी आरोरा यांच्या कंपनीत पैसे गुंतवले होते आणि त्यांना फसवले जात असल्याचे वाटत असल्याने त्यांनी पैशांच्या वसुलीसाठी आरोरा यांचे अपहरण केले असल्याची पोलीस चौकशीत माहिती दिली.

पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१०) दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, आणि पोलीस निरिक्षक (गुन्हे) गणेश पाटील यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि संतोष कांबळे, सपोनि विनोद लाड, पो.ह. तानाजी टिळेकर, बाबू येडगे, आदित्य झेंडे, वैभव पाचपांडे, संदिप सुरवाडे, पो.शि. सुर्यकांत शेट्टी, रविंद्र ठाकरे, प्रशांत धुरी, देवीदास पाटील, भास्कर भोये, अर्जुन राठोड, म.पो.शि. शितल लाड तसेच पो.शि. विशाल पिसाळ (तांत्रिक मदत) व झोनमधील इतर अधिकारी व पथक यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!