हिरानंदानी पवई येथील क्लिफ अव्हेन्यू मार्गावर हेरीटेज उद्यानाच्या बाहेर बनत असलेल्या बीट चौकीचे काम पूर्ण झाले आहे. शुक्रवार, २९ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता याचे उद्घाटन केले जाणार आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या हस्ते या चौकीचे उद्घाटन केले जाणार आहे. चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून ही बीट चौकी बनवण्यात आली आहे.
हिरानंदानी परिसरात विशेषतः क्लिफ अव्हेन्यूवर रोडवर तरुण – तरुणी उपद्रव निर्माण करतात. रात्रीच्या वेळी भरधाव वेगात मोटारसायकली चालवणे, ओरडणे आणि नशा करणे अशा गोष्टी या परिसरात वाढल्या आहेत. त्यामुळे येथे पोलिसांनी गस्त वाढवावी आणि क्लिफ अव्हेन्यू मार्गावर एक बीट चौकी बनवण्यात यावी अशी मागणी हिरानंदानी, पवई परिसरातील रहिवाशी अनेक दिवसांपासून करत होते.
हिरानंदानी, पवई रेसिडन्स असोसिएशन आणि रहिवाशांनी हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या उच्च अधिकार्यांपर्यंत पोहोचवत या भागात कायमस्वरूपी पोलिस बीट-चौकी करण्याची मागणी केली होती.
३ मार्च २०२१ला हिरानंदानी येथे पोलीस दलातील अधिकाऱ्यांसोबत येथील कायदा व सुव्यवस्थेच्या विविध मुद्यांवर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित चर्चेत अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (परीमंडळ १०) महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) रमेश नांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पवई पोलीस ठाणे) आबुराव सोनावणे आणि स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हिरानंदानी येथील पोलीस बीट चौकीच्या मंजुरीला हिरवा कंदील दिला होता आणि आमदार लांडे यांनी त्यांच्या फंडातून ही चौकी लवकरात लवकर उभी करू असे आश्वासन दिले होते. अखेर ३ वर्षाच्या अथक पाठपुराव्यानंतर या बीट चौकीचे काम पूर्ण झाले असून, शुक्रवारपासून या चौकीच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडणार आहेत.
रहिवाशी असोसिएशन सोबतच स्थानिक रहिवाशी हरीश अय्यर, दीपक दर्यानानी, हनुमान त्रिपाठी, प्रिया मोहन, मालबिन विक्टर यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.
या प्रयत्नात सक्रिय असलेले स्थानिक रहिवासी संजय तिवारी यांनी सांगितले की, “आम्ही हिरानंदानी पवईचे रहिवासी आनंदी आहोत आणि मुंबई पोलिसांचे आभारी आहोत की त्यांनी या भागात प्रभावीपणे पोलिस ठेवण्याच्या आमच्या मागणीकडे लक्ष दिले. आमदार दिलीप लांडे यांनी बीएमसी आणि पोलिसांशी समन्वय साधून या प्रक्रियेला गती दिली. आशा आहे की ही २४x७ बीट-चौकी पवईच्या या भागातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारेल.
No comments yet.