पवईतील रामबाग येथील क्रिस्टल पॅलेस इमारतीत फ्लॅट फोडून चोरट्याने घरातील १० लाखाची रोकड पळवल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. घरातील महिला कामानिमित्त मुंबईबाहेर असताना चोरट्याने हा डाव साधला आहे. विशेष म्हणजे महिलेच्या वडिलांच्या रामबाग येथील घरात पाठीमागील आठवड्यात नोकराने चोरी केली असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपाली गुरव (बदललेले नाव) या रामबाग येथील क्रिस्टल पॅलेस इमारतीत दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटमध्ये राहतात. काही कामानिमित्त त्या मुंबई बाहेर गेल्या होत्या. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या परिवारातील सदस्य फ्लॅटवर गेले असताना त्यांना घराचा दरवाजा उघडा असून, घरातील कपाट उचकटून सामान विस्कटलेले आढळून आले. याबाबत त्यांनी त्वरित गुरव यांना याबाबत माहिती दिली.
“चोराने कटावणीचा वापर केला असल्याची शक्यता आहे. फ्लॅटचा आतील दरवाजा आणि कपाट कटावणीने उचकटलेले दिसून येत आहे,” असे पवई पोलिसांच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
ते पुढे म्हणाले, “तक्रारदार यांनी दिलेल्या जवाबानुसार घरातील बेडमध्ये असणारी १० लाखाची रोकड चोरट्याने पळवली आहे. त्याने घरात इतरत्र शोधाशोध केली आहे, मात्र घरातील इतर कोणतीच किंमती वस्तू चोरी केली नसल्याचे तक्रारदार यांनी जवाबात म्हटले आहे.”
याबाबत पोलीस भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार चोरीचा गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत.
“आम्ही इमारतीचे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. संशयित व्यक्तींची माहिती मिळवण्याचे काम सुरु आहे. डॉग स्कोड देखील दाखल झाले असून, काही धागे हाती लागले आहेत, लवकरच आरोपी हा पोलीस कोठडीत असेल,” असे तपासी अधिकाऱ्याने आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
No comments yet.