पवईत रस्त्यांवर ठिकठिकाणी शिववडाच्या नावावर स्टॉल व गाड्या लावून खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांबद्दल महानगरपालिकेकडे पवईकराने माहितीच्या अधिकारानुसार केलेल्या अर्जातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पवई भागात चालणाऱ्या कोणत्याही शिववडापाव गाडीस पालिकेतर्फे मंजुरी देण्यात आली नसून, राजरोसपणे बेकायदेशीररित्या चालवल्या जात असल्याचे समोर आले आहे.
पवईत ठिकठिकाणी फुटपाथ व रस्त्यावर राजरोसपणे बेकायदेशीररित्या स्टॉल व गाड्या लावून खाद्यपदार्थ विक्री चालते. मात्र महानगरपालिकेकडून फक्त गोरगरिब, सामान्य माणसांच्या व बेरोजगारांच्या स्टॉल व गाड्यांवरच कारवाई केली जाते. उलट या गाड्यांच्या बाजूलाच असणाऱ्या शिववडापावच्या स्टॉलवर मात्र कानाडोळा करत पालिकेतर्फे कारवाई करण्यात येत नाही, असा आरोप पवईकरांकडून केला जात आहे.
यासंदर्भात पवईकर प्रभाकर बालन यांनी पालिका ‘एस’ विभागाला माहितीचा अधिकार अन्वये पवईत किती शिववडापावच्या गाड्या आहेत? त्यांचे मालकी हक्क कोणाकडे आहेत? व किती शिववडापाव गाड्यांना अनुमती देण्यात आली असल्याची माहिती मागितली होती. (प्रत आवर्तन पवईकडे आहे) यास उत्तर देताना पालिकेने गाड्यांची संख्या व मालकी हक्काची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगतानाच पालिका अतिक्रमण विभागातर्फे शिववडा व शिववडापाव गाड्यांना कोणत्याही प्रकारची अनुमती दिली नसल्याचे उत्तर दिले आहे.
“गरीब, बेरोजगारांच्या स्टॉलवर कारवाई केली जाते आणि शिववडापावच्या गाडीवर कारवाई नाही असा दुजाभाव महापालिकेकडून केला जातो आहे. या कारवाईला रोखण्यासाठी स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी व नेते महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे”, असे प्रभाकर बालन यांनी याबाबत ‘आवर्तन पवई’शी बोलताना सांगितले.
“हे संपूर्ण आरोप बिन बुडाचे आहेत, शिववडापावच्या गाडीवर सुद्धा कारवाई करण्यात आलेल्या आहेत, दंड सुद्धा भरलेले आहेत. (दंडाच्या पावतीची प्रत आवर्तन पवईकडे आहे) हिरानंदानी विकासकाच्या अखत्यारीत येणाऱ्या जागेवर असणाऱ्या गाड्यांसाठी आम्ही त्यांच्याकडून अनुमती घेतली आहे असे एका शिववडापाव गाडीच्या मालकाने आमच्याशी बोलताना सांगितले. मात्र हिरानंदानी प्रशासनाने अशा प्रकारे कोणतीही अनुमती दिली नसल्याचे स्पष्ट करत, उलट त्या बेकायदेशीर गाड्यांना हटवण्यासाठी पत्रव्यवहार (प्रत आवर्तन पवईकडे आहे) केला असल्याचे त्यांनी आवर्तन पवईला सांगितले.
याबाबत या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिक व वडापावचा धंदा चालवणाऱ्या लोकांच्यात प्रचंड नाराजी असून, लवकरच यांचे काही प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली समस्या ठेवणार आहेत.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.