कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (ICSE – दहावी) परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेत चांदिवली परिसरात वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय चालवणाऱ्या दाम्पत्याची मुलगी प्राप्ती प्रताप भास्कर या विद्यार्थिनीने आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत ८८% गुण मिळवत चांदिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
प्राप्तीने तिच्या या यशाचे श्रेय तिच्या पालकांना देतानाच तिच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात केलेल्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
“माझे आई वडील पहाटे उठून कामासाठी निघत असे त्यानंतर न थकता ते माझ्या शैक्षणिक कार्यात सक्रिय सहभागही घेत. आईने मला मराठी शिकवण्यासाठी वेळ दिला, तर वडिलांनी गणित शिकवण्याची जबाबदारी घेतली.” असे यावेळी बोलताना प्राप्ती म्हणाली.
सोबतच या मेहनती विद्यार्थिनीने तिच्या शाळेतील शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, ज्यांनी तिच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सतत पाठिंबा देत, शंका दूर करण्यात मदत केल्याबद्दल आणि आव्हानात्मक विषयांमध्ये तिला मार्गदर्शन केल्याबद्दल तिने त्यांचे कौतुक केले.
आपल्या यशाबद्दल बोलताना तिने सांगितले की, मी अभ्यासाला प्राधान्य दिले आणि व्यवस्थित वेळापत्रकाचे पालन केले. निरोगी राहण्यासोबतच मित्र आणि कुटूंबासोबत वेळ घालवणे, अभ्यासोत्तर उपक्रमांमध्ये गुंतणे, खेळणे यासारख्या गोष्टींचा देखील समावेश केला.
प्राप्तीला वाणिज्य क्षेत्रात करिअर करण्याची आकांक्षा असून, अकाऊंटिंग, मार्केटिंग आणि फायनान्समध्ये स्पेशलायझेशन करण्याचे उद्दिष्ट आहे.
No comments yet.