८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पवई पोलिसांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला. आपआपल्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांचा परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त डॉ महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. चांदिवली येथील मेगारुगास हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) मुकुंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत, पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील, पोलीस निरीक्षक सावंत, पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस निरीक्षक दळवी, महिला पोलीस अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
स्त्रियांच्या प्रगतीवरून त्या समाजाची प्रगती मोजता येते असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. बाबासाहेबांनी पाहिलेल्या या प्रगत समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी महिला सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहेत. अशाच काही स्त्रियांच्या कर्तुत्वाचा आणि प्रतिनिधित्वाचा सन्मान पवई पोलिसांतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत करण्यात आला.
यावेळी प्रिया मोहन (समाजसेवक), डॉ कमलिनी पाठक (रोटरी क्लब), काल्विंदर लिपचा (समाजसेवक), रुपाली रावराणे (शिक्षक), डॉ शर्मिला जाधव (मुख्य कार्यकारी अधिकारी पवई हॉस्पिटल), कार्तिकी भोसले (रिक्षाचालक), सुनिता सोनावणे (अंगणवाडी सेविका), निता शिंदे (अंगणवाडी सेविका), विजया आंबोरे (समाजसेविका), बिनु वर्गीस (परिचारिका – हिरानंदानी हॉस्पिटल), सीमा यादव (ट्राफिक वॉर्डन), लक्ष्मी शिंदे (ट्राफिक वॉर्डन), मालन झाडे (सफाई कर्मचारी), शांता मेथाडीस (सफाई कर्मचारी), पूजा कल्याणे (मुंबई पोलीस), सुवर्णा बोडके (मुंबई पोलीस), संगीता हरकळ (मुंबई पोलीस), सुमैय्या पठाण (समाजसेविका), अर्चना मांजरेकर, अनुषा भट (जेएमजे गृप) यांचा त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
“आज स्त्रिया पुरुषांच्या केवळ बरोबरीने नाहीत, तर पुरुषांच्या दोन-चार पाऊले पुढेच आहेत. महिला घर-संसार सांभाळण्या सोबतच अनेक ठिकाणी आपल्या सर्वशक्तीनिशी मोलाची भूमिका बजावत असतात. अशा ‘ती’ला अनेक अडचणी येतात, त्यांचा ‘ती’ सामना करते. ‘ती’च्या कार्याचा आणि कर्तुत्वाचा सन्मान करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि त्यांना सन्मानित करून आम्ही त्यांच्या धाडस आणि कर्तुत्वाचा सन्मान करून इतर महिलांनासुद्धा प्रोत्साहित करतो.” असे यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त परिमंडळ १० महेश्वर रेड्डी म्हणाले.
No comments yet.