हिरानंदानीतील डी-मार्ट जवळील चौकाला निर्भीड पत्रकार जेडे यांचे नाव देण्यात आले आहे. बुधवारी १३ जूनला महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते नामफलकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जेडे यांच्या पत्नी शोभा डे, हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, आमदार नसीम खान, नगरसेवक चंदन शर्मा, प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीर सिंग व मोठ्या प्रमाणात पत्रकार उपस्थित होते.
पत्रकार जेडे यांची ११ जून २०११ रोजी मोटारसायकलवरून आलेल्या छोटा राजन टोळीच्या चार गुंडांनी हिरानंदानीतील डी-मार्टजवळ गोळ्या घालून हत्या केली होती. त्यावेळी ते मिड-डे दैनिकात संपादक (गुन्हे) म्हणून कार्यरत होते. ज्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ येथील चौकाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पत्रकार संघाकडून केली जात होती. अखेर पाच वर्षांनी त्यांची हत्या करण्यात आलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या चौकाला ‘पत्रकार जेडे चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना महापौर आंबेकर म्हणाल्या, “जेडे एक निर्भीड पत्रकार आणि सत्य मांडणारे पत्रकार होते. आज प्रत्येक पत्रकाराने त्यांचा आदर्श ठेवून जबाबदार पत्रकाराचे कर्तव्य निभावणे आवश्यक आहे.” जेडे यांच्या नामफलकाच्या खाली त्यांचा कार्याची माहिती देणे आवश्यक आहे. ज्यामुळे येथे नवीन आलेल्या लोकांना त्यांच्या कार्याची माहिती मिळेल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी अनेकांना त्यांच्या आठवणींने भरून आले होते. त्यांच्या पत्नी शोभा डे यांनी यावेळी आठवण व्यक्त करताना सांगितले, ‘जेडेंच्या स्वभावात प्रेम, धाडस आणि प्रत्येक व्यक्तीला आपलेसे करणारे गुण होते. आम्हाला त्यांचा गर्व आहे.
“पत्रकारांना कधीच सन्मान दिला जात नाही. मात्र, आम्ही जेडे यांना शहीदचा सन्मान दिला आहे. त्यांच्या सन्मानासाठीच आम्ही येथील चौकाला त्यांचे नाव देण्याचे निश्चित केले. आम्हाला येत असलेल्या धमकीच्या प्रसंगी जेडे आम्हाला येऊन भेटले होते. जेडें यांचे नाव या चौकाला देवून त्यांचे पवईशी असणारे नाते आम्ही घट्ट केले आहे.” – हिरानंदानी समूह संचालक निरंजन हिरानंदानी
आमदार नसीम खान यांनी सुद्धा त्यांच्या आठवणींना उजाळा देत पत्रकारांच्या सुरक्षेसाठी सरकारने पाऊले उचलली पाहिजेत असे मत व्यक्त केले.
“आम्ही गेली चार वर्ष या चौकाला जेडे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करत होतो. यासाठी आमचे सहकारी मित्र आणि येथे उपस्थित सर्व मान्यवरांनी आपआपल्या परीने सर्व प्रयत्न केले आणि आज या चौकाला जेडे यांचे नाव देण्यात आले आहे. आपले परम कर्तव्य करत असताना आपला जीव गमावलेल्या पत्रकारांचे हे प्रतिक आहे. जेडेंची केस अजून ओपन आहे, समाधानात्मक तपास झालेला नाही, आम्हाला त्यांच्या या केसमध्ये न्याय हवा आहे. आम्ही याचा सतत पाठपुरावा करू, असे यावेळी बोलताना प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीर सिंघ म्हणाले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.