स्वतंत्र भारताचा ७४वा प्रजासत्ताक दिन सोहळा पवई, चांदिवलीमध्ये विविध ठिकाणी धूमधडाक्यात साजरा झाला. पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये देखील मोठ्या उत्साहात अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन पार पडला. यावेळी माजी सैनिक कमांडर विजय वडेरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पवई इंग्लिश हायस्कूलच्या या राष्ट्रीय उत्सवाचे आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे आणि विविध आकर्षक कार्यक्रमांनी रंगलेले ‘कलादर्पण’ – कला, संस्कृती प्रदर्शनी.
विविध सत्रात झालेल्या या कार्यक्रमाला कमांडर विजय वडेरा यांच्यासोबतच, अभिनेते जयराज नाडार, कमांडर जीवीके उन्नितन, कॅप्टन अविनाश नेरुळकर, डॉ. नारायण अय्यर (मुख्य कार्यकारी अधिकारी – भारतीय विकास प्रतिष्ठान), डॉ. नंदकुमार जाधव, लेखक केटी बागली. नर्स पुष्पा मोन्सी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सूर्यवंशी (पवई वाहतूक विभाग), समाजसेविका राजुल संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
जीएचपी ग्रुपच्या सहकार्याने शाळेच्या प्राचार्या शर्ली उदयकुमार, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्रीकुमार मेनन, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका बिनु नायर आणि पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याद्यापिका भावना मागो यांच्या संकल्पनेतून हे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी शाळेचे कला शिक्षक लहुराज राणे, प्रमिला अटकरे आणि इतर शिक्षक यांच्या मदतीने आयोजित या कलादर्पणमध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे, क्राफ्ट, बॉटल पेंटिंग आर्ट, कोलाज यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनीचा विविध शाळेच्या विद्यार्थ्यांसह, शिक्षक आणि पवईकरांनी आनंद घेतला.
प्रजासत्ताक दिनी प्रत्येकवर्षी दिल्लीतील कर्मपथावर विविध राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या चित्ररथांचे मिनी रूप यावर्षी पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये आयोजित कलादर्पणमध्ये पाहायला मिळाले. विविध राज्यातील कला, संस्कृती, कपडे, खाद्य, प्रसिद्ध व्यक्ती आणि महत्वाची ठिकाणे यांचे दर्शन विद्यार्थी आणि शिक्षक यांनी घडवले. संस्कृतीदर्पणच्या माध्यमातून नारी शक्ती, क्रीडा, पर्यावरण, संस्कृती, धर्म, इतिहास, साहस, पुरातत्व, पर्यटन व लोककलेच्या परंपरेचे दर्शन घडवण्यात आले.
शाळेच्या आवारात विज्ञानाचे आणि भारतीय सैन्यदलाची विमाने, युध्द नौका, तोफा, बंदुका, मिसाईल्स यासह विविध गोष्टींच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून भारताच्या ताकतीचे दर्शन घडवण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून सैन्यदलाच्या शौर्याचे दर्शन घडले.
विविध क्षेत्रात आपले कर्तव्य निभावताना सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, पोलीस कर्मचारी, डॉक्टर, शिक्षक, नर्स, समाजसेवक, पत्रकार यांना पुरस्कार देवून शाळेतर्फे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
No comments yet.