मुंबईच्या आयआयटी कॅम्पसमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आयआयटी कॅम्पसच्या हॉस्टेल नंबर १२च्या पाठीमागे सोमवारी रात्री बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आयआयटी कॅम्पसमध्ये बिबट्या दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही कॅम्पसमध्ये बिबट्या दिसला होता. बोरीवली राष्ट्रीय उद्यानाला लागून असल्याने आयआयटी कॅम्पस परिसरात याआधी देखील अशा प्रकारचा बिबट्याचा वावर पाहायला मिळाला आहे.
बिबट्या दिसल्याबाबत वनविभागाला कॉल करण्यात आला होता. याची तपासणी करण्यासाठी एक पथक पाठवण्यात आल्याचे वनविभागाने सांगितले. “पवईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT-B)च्या कॅम्पसमध्ये कथितपणे एक बिबट्या दिसला होता आणि वनविभागाला सतर्क करण्यात आले होते,” असे वन अधिकाऱ्याने सांगितले.
“आमची टीम तपास करत आहे आणि सर्व आवश्यक कृती सुरू आहेत. आम्ही विद्यार्थी, कर्मचारी, व्यवस्थापन आणि इतर नागरिकांना घाबरू नका, असे आवाहन केले आहे.” असेही अधिकारी म्हणाले.
No comments yet.