विकासकाने पालिकेला सुपूर्द न केल्याने वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या पंचश्रुष्टी रोडला नवसंजीवनी मिळणार असल्याची आशा देत स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांनी नारळ फोडून हे काम लवकरात लवकर करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र ३ महिन्यातच हा मार्ग बनवून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार होता त्याला जवळपास वर्ष उलटून गेले तरी या रस्त्याचे काम सुरु झाले नसल्याने आता येथील स्थानिक नागरिकांच्या मनात ‘या रस्त्याचा मुहुर्त कधी?’ असा प्रश्न घोंगावत आहे.
चांदिवली आणि हिरानंदानी परिसराला पंचश्रुष्टी कॉम्प्लेक्स परिसरातून जाणारा रस्ता हा सगळ्यात मोठा दुवा आहे. मात्र विकासक आणि पालिका यांच्या पूर्तता आणि मंजुऱ्या यात अडकून पडल्याने पाठीमागील जवळपास २ दशकापासून हा रस्ता दुरावस्थेत पडला आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांना वर्षानुवर्ष खड्डयातून आणि खराब मार्गानेच प्रवास करणे भाग पडत आहे. त्यातच चांदिवली – हिरानंदानी जोडणारा अजून एक मार्ग बनवण्याचे काम सुरु झाले होते मात्र ते काही मंजुरीसाठी अडकून पडल्याने या मार्गावर खूप मोठा दबाव निर्माण झाला आहे.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक नागरिक या परिसरात राहण्यास येण्यास टाळत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. आम्ही वर्षानुवर्ष याचा पाठपुरावा करत आहोत,” असे याबाबत बोलताना पंचश्रुष्टी रहिवाशांच्यावतीने सांगण्यात आले.
ते पुढे म्हणाले, “आमदार दिलीप मामा लांडे यांनी पाठीमागील वर्षी २६ जानेवारी रोजी पालिकेतर्फे या परिसरात सिमेंट कॉंक्रीट रोडच्या कामाच्या सुरुवातीचा नारळ फोडला होता. यावेळी त्यांनी रस्त्याच्या खालून, पाईपलाईन, केबल गेले आहेत त्याची पूर्ण माहिती मिळवत या मार्गाचे येणाऱ्या ३ महिन्यात पूर्ण करतो असे आश्वासन दिले होते. मात्र आता १ वर्षापेक्षा जास्त दिवस झाले तरी रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यात आलेली नाही.”
या रस्त्याच्या कामाचा नारळ फोडण्यात आल्यानंतर आसपासच्या परिसरातही अजून काही रस्त्यांची मंजुरी झाली होती. त्यांचे काम पूर्ण झाले असून ते मार्ग वाहतुकीसाठी खुले सुद्धा झाले आहेत. मात्र पंचश्रुष्टी रोडच्या कामात काहीच प्रगती नसल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत.
यासंदर्भात आवर्तन पवईने आमदार लांडे यांना रस्त्याचे काम कधी सुरु करणार ? अशी विचारणा केली असता “लवकरच सुरु करतोय!” असे सांगितले होते. मात्र अजूनही याबाबत काहीच हालचाल दिसत नाही.
आमदार लांडे यांच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी शाळा सुरु झाल्याने या मार्गावरून अनेक शालेय वाहनांची वाहतूक होत असते. अशात रोडच्या कामामुळे या संपूर्ण वाहतुकीचा दबाव डीपी रोडवर निर्माण झाला असता आणि रामबागकडे जाणाऱ्या मार्गावर आधीच वाहतूक कोंडी होत असते. त्यात भर पडल्याने संपूर्ण पवई, चांदिवली जाम होण्याची शक्यता असल्याने हे काम शाळेना सुट्टी लागल्यावर करण्याचे नियोजित असल्याचे सांगण्यात आले.
आता शाळेना सुट्ट्या लागल्या असून,मामांनी लवकरात लवकर या रोडच्या कामाची सुरुवात करावी अशी मागणी पंचश्रुष्टी नागरिकांकडून होत आहे. असे न झाल्यास लवकरच हा मार्ग बाहेरील वाहनांसाठी बंद करणार असल्याचे रहिवाशांच्यावतीने सांगण्यात येत आहे.
No comments yet.