आरोपीवर यापूर्वी खुनाचा गुन्हा आणि पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे. या भामट्याचे आणखी नऊ बळी शोधण्यात साकीनाका पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.
मासे निर्यातदार असल्याचे भासवून मुंबई, महाराष्ट्रसह आंध्र प्रदेशातील अनेक मासळी विक्रेत्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील सुरत येथून एका ४१ वर्षीय व्यक्तीला साकीनाका पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल ४ महिने या भामट्याच्या संपूर्ण कारभारावर पाळत ठेवून माहिती मिळवत रविवारी साकीनाका पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इम्रान मोहम्मद हुसैन कादरी असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी आकाश कांबळे हे मासे व्यापारी असून, त्यांचा मुंबईतील साकीनाका पोलिसांच्या हद्दीत व्यवसाय आहे. २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात मासे पुरवठा करण्याच्या व्यावसायिकांच्या शोधात असताना गुगलवर त्यांना मयूर शहा नामक व्यक्तीचा नंबर प्राप्त झाला. या क्रमांकावर संपर्क साधत त्यांनी माशाची ऑर्डर देत शहा याला ३.१३ लाख रुपयाचे पेमेंट देखील केले होते. तथापि, तक्रारदाराला माल मिळाला नाही किंवा त्याचे पैसे देखील परत मिळाले नाहीत.
आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच कांबळे यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.
“आरोपी याने एक अतिशय व्यावसायिक वाटणारे फेसबुक पेज, गुगल बिझनेस प्रोफाईल तसेच व्हॉट्सअॅप खाते तयार केले होते, ज्याद्वारे तो व्यापाऱ्यांशी संवाद साधत असे. मासळी व्यापाऱ्यांशी चर्चा करताना, तो त्यांना आवश्यक असणाऱ्या अशा माशांच्या प्रकारांची योग्य चित्रे आणि दर पाठवत असे. त्याने या संपूर्ण व्यावसायिक प्रोफाईलमध्ये आपले खरे नाव उघड न करता मयूर शहा या नावाने तो हे सगळे व्यवहार व चर्चा करत होता,” असे साकीनाका पोलिसांनी सांगितले.
एकदा व्यवहार ठरला की तो ग्राहकांना आगाऊ पैसे देण्यास सांगे, जेणेकरून तो त्यांचा माल पाठवू शकेल. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आरोपी हा खरेदीदाराला माल घेवून येणाऱ्या ट्रकचा टायर पंक्चर झाला आहे किंवा इतर त्रुटी आहेत अशी विविध कारणे देत ऑर्डर मिळण्यास उशीर होत असल्याचे सांगत असे. “काही दिवस विविध कारणाने चालढकल केल्यानंतर तो त्याचा नंबर बंद करून आणि फेसबुक आणि गुगलवरील त्याच्या व्यवसायाचे नाव आणि नंबर यासारखे सर्व तपशील बदले,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुन्ह्याच्या अनुषंगाने साकीनाका पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने यासंदर्भात महाराष्ट्रसह, सुरतमधील मासळी व्यापारी आणि निर्यातदारांच्या खात्यांचा शोध घेतला आणि आरोपीच्या संपर्कात आले आणि रविवारी त्याला सुरत येथून अटक केली.
पोलीस तपासात पुढे असेही आढळून आले की आरोपीवर यापूर्वी खुनाचा आणि सुरतमधील पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा देखील संबंधित पोलीस ठाण्यात दाखल आहे.
No comments yet.