बांधकामाला सुरुवात करून ६ महिन्यांनंतर लोकांचा सल्ला मागणे म्हणजे कागदपत्रांची पूर्ततेची औपचारिकता – सामाजिक कार्यकर्ते
लोखंडवाला – विक्रोळी या भागात बनवण्यात येणाऱ्या मेट्रो – ६ प्रकल्पाच्या कॉरिडोरच्या निर्मिती कामाच्या सुरू करण्याच्या जवळजवळ सहा महिन्यानंतर अखेर एमएमआरडीएने याबाबत नागरिकांचा सल्ला मागितला आहे. रविवारी एमएमआरडीएने पब्लिक नोटीस प्रसारित करून मेट्रो- ६ कॉरीडॉर, पर्यावरण आणि समाजावरील बांधकामांच्या प्रभावाबाबत सल्ला मागितला आहे.
मात्र जनमत विचारात न-घेता प्रकल्पाचे काम सुरु करून सहा महिने उलटल्यावर प्राधिकरण लोकांकडून सल्ले मागत असल्यामुळे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या टप्प्यावर बांधकामसुरू केल्यानंतर लोकांचा सल्ला विचारणे केवळ कागदपत्रांच्या बाबतीतील औपचारिकता असून बाकी काही नाही.
कार्यकर्त्यांनी प्रश्न केला आहे की, जर करार आधीच झाला आहे, कंत्राटदार निवडून कंत्राट दिले गेले असेल, आणि बांधकाम सुद्धा सुरु झाले आहे तर अशा वेळी नागरिकांनी दिलेल्या सूचना किंवा आक्षेप कसे अंमलात आणले जातील.
जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड आणि पवई मार्गे जाणाऱ्या मेट्रो-६ प्रकल्पाचे बांधकाम कार्य डिसेंबर २०१८ पासून सुरु झाले आहे. मात्र यापूर्वीच या मार्गावरील मेट्रो प्रकल्प हा जमिनीवर बनवण्याऐवजी भूगर्भीय (अंडरग्राउंड) करावा अशी मागणी नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती.
‘एमएमआरडीएने सर्व निर्णय घेतल्यानंतर आता ते नागरिकांचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारला पर्यावरणाची काळजी नाही. ही सार्वजनिक सूचना (पब्लिक नोटीस) ही आमची सरकार कशा प्रकारे काम करते याचे एक उत्तम उदाहरण आहे’ असे याबाबत बोलताना पवईकर सोनाली मिश्रा यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या ‘मी सहमत आहे की बांधकाम काम सुरू झाल्यानंतर लोकांचा सल्ला मागण्याची ही कसरत फक्त कागदोपत्री पूर्ततेसाठी आहे. परंतु आम्ही अद्यापही बैठकीला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करू आणि आमचा आक्षेप नोंदवू.’
‘मेट्रो – ६ प्रकल्पाचे नियोजनच मुळात चुकीचे आहे. स्टेशनची जागा, पर्यावरण रक्षणासाठी उपाय-योजना, जेव्हीएलआरवरील वाहतूक कोंडी, नागरिकांच्या मागण्या असा कशाचाच विचार न करता हा प्रकल्प राबवला जात आहे. लोकांच्या मतांचा विचार करूनच कोणताही प्रकल्प होणे आवश्यक आहे’ असे याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र धिवार यांनी सांगितले.
मंगळवारी, २१ मे २०१९ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत एमएमआरडीएतर्फे घेण्यात येणारी सार्वजनिक सूचनांची बैठक होणार आहे. एमएमआरडीए नवीन इमारत, बीकेसी, बांद्रा पूर्व येथे सदर बैठक घेण्यात येईल.
एमएमआरडीएने जाहीर केलेल्या सार्वजनिक नोटिसनुसार “एमएमआरडीएने महाराष्ट्र सरकारच्या मंजुरीसह मेट्रो-६ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली आहे. एमएमआरडीए विविध भागधारकांना आणि लोकांना या प्रकल्पाची माहिती देण्यास आणि सल्ला घेण्यास इच्छुक आहे. या प्रकल्पामध्ये स्वारस्य असलेल्या एनजीओ, पर्यावरण प्रेमी, शैक्षणिक, हितधारक, इत्यादींसह सर्व व्यक्तींना उपस्थित राहण्यासाठी आणि बैठकीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.”
मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी सोबतच या मार्गात असणाऱ्या जुन्या पर्जन्य वाहिन्या आणि पावसाचे पाणी साठणे, डेब्रिज साठणे असे प्रसंग उद्भवणार आहेत. पालिकेने याची योग्य काळजी घेतली नाही तर मोठी समस्या निर्माण होवू शकते याचा विचार करणे सुद्धा आवश्यक आहे. असे याबाबत बोलताना पवईकरांनी सांगितले.
मेट्रो सहा प्रकल्प कसा धोकादायक आहे आणि या प्रकल्पाबाबत आक्षेप आणि सूचना मागवण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सोशल मिडियाच्या माध्यमातून एक गृप (समूह) तयार करण्यात आला असून, या प्रकल्पात येणाऱ्या परिसरातील इमारतीत राहणारे किमान दोन प्रतिनिधी या समूहात आपल्या लोकांची मते मांडणार आहेत. येथे आलेल्या सूचना आणि हरकतीना नागरिकांच्यावतीने एमएमआरडीएच्या होणाऱ्या बैठकीत मांडले जाणार आहे.
No comments yet.