कायदा – सुवस्थेत महत्वाचा भाग असणाऱ्या पवईतील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील बीट चौकीचे नुकतेच मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस सह – आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पश्चिम प्रादेशिक विभाग अप्पर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ १० डॉ. महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त, साकीनाका विभाग मुकूंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे, स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे, जीएचपी समूहाचे प्रशांत शर्मा उपस्थित होते.
जवळपास १७ किलोमीटर परिसरात आणि जवळपास ८ लाखाची लोकसंख्या असणाऱ्या पवई परिसराची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी पवई पोलीस ठाण्यात कार्यरत अधिकाऱ्यांवर असते. बीट क्र. १ – पवई गार्डन पोलीस चौकी, बीट क्र. २ – मोरारजी नगर पोलीस चौकी, बीट क्र. ३ – तुंगागाव पोलीस चौकी, बीट क्र. ४ – आयआयटी मेनगेट पोलीस चौकी अशा चार बीट चौक्यांच्या मदतीने ही कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करण्यात येते. मात्र पाठीमागील काही वर्षात पवई गार्डन येथील पोलीस बीट चौकीची अवस्था वाईट होती. ज्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना येथे बसून काम करणे अवघड जात होते. त्यांच्या याच त्रासाची दखल घेत जीएचपी समूहातर्फे या बीट चौकीचे पुनर्बांधणीचे काम करण्यात आले होते.
“या चौकीच्या अखत्यारीत तुंगागाव सह मरोळ आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर असणारा अनेक भाग येतो. अनेक शैक्षणिक संस्था, रुग्णालये अति महत्वाच्या ठिकाणांसोबतच एनएसजी हब सारख्या जागांचा समावेश आहे. त्यामुळे या भागात नियंत्रण आणि निगराणी ठेवण्यासाठी या चौकीची मोठी मदत होते,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
या बीट चौकीचे पवई पोलीस ठाण्याच्या इतिहासात खूप महत्वाचे स्थान आहे. कारण येथूनच पवई पोलीस ठाण्याच्या कार्याची सुरुवात झाली होती. येथे एका झोपडी सदृश्य जागेतच पहिले पवई पोलीस ठाणे उभे करण्यात आले होते. पुढे परिसराच्या विकासाबरोबरच रामबाग येथे पवई पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. जे मुंबईतील पहिले भव्य असे पोलीस ठाणे ठरले.
No comments yet.