जेव्हीएलआरवरील खड्यामुळे अपघात घडून मोटारसायकल चालक जखमी

अपघातात जखमी प्रसाद मेस्त्री

जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर खड्यात अडकून एक मुंबईकर गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पवई परिसरात घडली. प्रसाद मेस्त्री असे जखमी मुंबईकराचे नाव असून, त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रशासनाकडे आपली ही व्यथा मांडली आहे. या संदर्भात महानगरपालिका एस विभागाने उत्तर देताना आम्ही संबंधित विभागाला आपली तक्रार देवू असे उत्तर दिले.

पावसाळा आणि रोडवरील खड्डे हे गणित मुंबईकरांना काही नवीन नाही. मात्र यावेळी पालिकेने नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते देण्यासाठी कंबर कसली असून, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पालिकेने आपल्या विभागातील खड्डयांचे फोटो पाठवा म्हणत मुंबईतील सर्वच विभागाच्या रस्ते अभियंत्यांचे व्हॉटस्ऍप नंबर जाहीर केले आहेत. मात्र सुरुवातीलाच पालिका एस विभागाच्या रस्ते अभियंत्याचा व्हाट्सऍप नंबर बंद असल्याने तक्रारदारांची मोठी गैरसोय झाली होती. याच्या पाठपुराव्यानंतर उशिरा हा नंबर सुरु करण्यात आला होता. मात्र या नंबरवर तक्रार केल्यानंतरही अनेक दिवस समस्या मिटत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पवईतील अंतर्गत रस्त्यांसोबतच जेव्हीएलआरवर सुद्धा खड्डे पडले आहेत. याबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकवेळा मुंबईकरांनी तक्रारी करूनसुद्धा पालिकेने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.

जेव्हीएलआरवरील हिरानंदानी बस स्थानकाजवळ सुद्धा रस्त्यावरील खड्डा पेवर ब्लॉक टाकून बनवल्याने असमतोल निर्माण झाला आहे. बुधवारी येथून प्रवास करताना एक मुंबईकर प्रसाद मेस्त्री या ठिकाणी गाडी अडकल्याने पडून जखमी झाले आहेत.

याबाबत त्यांनी नंतर ट्विटरवरून प्रशासनाकडे आपली व्यथा मांडली आहे. ते म्हणतात “जेव्हीएलआरवरील हिरानंदानी बस स्टॉपजवळील असमान रस्त्यामुळे झालेल्या दुर्घटनेतून बचावलो आहे. यामुळे आणखी कोणाशी अशी दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने आवश्यक ती कारवाई करावी अशी विनंती. अपघाताच्या वेळच्या प्रत्यक्षदर्शिनी रस्त्याच्या या दुरावस्थेबाबत आपला राग व्यक्त करताना येथे जवळजवळ दररोज अपघात घडत असल्याबाबत सांगितले. येथे घडून आलेल्या कोणत्याही मोठ्या दुर्घटना किंवा जीवितहानीची जबाबदारी बीएमसी घेईल का? एका ३ वर्षाच्या मुलीचा बाप म्हणून माझा पालिका अधिकार्‍याना प्रश्न आहे.”

अपघाताचे ठिकाण

“अपघात घडला तेव्हा त्यांच्या पाठीमागून एक ट्रक जात होता. त्याच्याखाली येण्यापासून ते थोडक्यात बचावले आहेत,” असे याबाबत बोलताना काही प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

याबाबत त्यांनी पालिकेला जाब विचारला असता, आम्ही आपली काळजी समजू शकतो. आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. लवकरात लवकर याचे निराकरण केले जाईल, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या @mybmc या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. तर पालिका एस विभाग यांनी आम्ही संबंधित विभागाला आपली तक्रार देवू असे उत्तर दिले. आज (शुक्रवारी, २६ जुलै २०१९) पालिका एस विभागाने डागडुजी करण्यात आलेल्या जागेचे फोटो टाकत तक्रारीचे निवारण करण्यात आल्याचे म्हटले आहे.

सध्या जेव्हीएलआरवर मेट्रोचे काम सुरु आहे. यासाठी बरीकेडिंग करण्यात आल्याने खूपच कमी रस्ता वाहतुकीसाठी उरला आहे. त्यातच खड्डे पडल्याने वाहतूक मंदावून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. या पडलेल्या खड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार पडत असतात. रस्त्यावर वाहने धावत असताना अशी एखादी व्यक्ती तोल जावून पडल्यास पालिका किंवा प्रशासन याची जबाबदारी घेईल का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

मेस्त्री यांनी मांडलेल्या व्यथेवर उत्तर देताना अनेक मुंबईकरांनी पालिकेच्या आणि लोकप्रतिनिधीच्या ढिसाळ कारभारावर राग व्यक्त केला आहे. इथे प्रसाद बोरकर उद्धव ठाकरे यांना टॅग करत म्हणतात, “बघा काय होतंय ते. किती लक्ष आहे तेथील नगरसेवकाच? उपयोग काय निवडून देऊन? हे एकच नाही असे अनेक ठिकाणी होत असेल. प्रत्येक नगरसेवकांचे कर्तव्य नाही का, आपापल्या विभागातील रस्ते पावसाळ्यापूर्वीच पाहून खराब असल्यास ठीक करून घ्यावे? का फक्त मत मागायलाच फिरायचं? विचार व्हावा.”

जसे पालिका पार्किंग, कचरा अशा विविध गोष्टींसाठी दंड आकारते तसेच पालिकेने चांगले काम केले नाही म्हणून त्यांच्याकडून दंड आकारला जाण्याची तरतूद असायला हवी. असाही राग काही मुंबईकरांनी यावर व्यक्त केला आहे.

पालिकेतर्फे देण्यात आलेली उत्तरे

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!