गांधीनगर उड्डाणपुलावर कंटेनर पलटला, जेव्हीएलआरवर दोन तास वाहतूक कोंडी

आज (शुक्रवार) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गांधीनगर येथील उड्डाणपुलावर कचरा घेवून जाणारा कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली. पवईकडून पूर्व धृतगती मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर हा कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक रोखण्यात आली होती. पुलाच्या खालून वाहतूक वळवल्याने जवळपास २ तास वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर क्रेनच्या मदतीने कंटेनर हटवल्यानंतर दुपारच्या आसपास वाहतूक सुरळीत झाली.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कंटेनर क्रमांक एमएच ०१ सीआर २५२ हा नेहमीप्रमाणे कचरा घेवून कांजुरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंड येथे टाकण्यासाठी निघाला होता. रात्रभर पडलेल्या पावसामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर ओलसरपणा होता. त्यातच गांधीनगर उड्डाणपुलावर जाणाऱ्या वाहनातून ऑईल पडले असल्याने रस्ता निसरडा झाला होता. “या निसरड्या रस्त्यावरून जाताना कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाला. सुदैवाने कंटेनर चालक आणि क्लिनर वेळीच बाहेर पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर टागोरनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत” असे याबाबत बोलताना वाहतूक पोलिसांनी सांगितले.

सकाळी मुंबईकरांच्या कामावर जाण्याच्या वेळीच आणि मुंबईतील सर्वात व्यस्त मानल्या जाणाऱ्या जेव्हीएलआरवर हा अपघात घडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पूर्व धृतगती मार्गाकडे जाणारी संपूर्ण वाहतूक गांधीनगर उड्डाणपुलाच्या खालून वळवण्यात आली होती. मात्र एलबीएस मार्ग पूर्वीपासूनच मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीत अडकलेला असताना वळवण्यात आलेल्या या वाहतुकीने अजूनच मोठी समस्या निर्माण झाली होती.

दोन क्रेनच्या साहय्याने रस्त्यावर आडवा झालेला हा कंटेनर हटवण्यात जवळपास १ तासानंतर यश आले. मात्र तोपर्यंत उड्डाणपुलावरून जाणारी वाहतूक रोखण्यात आल्याने संपूर्ण जेव्हीएलआर जाम झाला होता. रस्त्यावर पडलेले ऑईल अग्निशमन दलाकडून साफ करण्यात आल्यानंतर उड्डाणपुलाच्या मार्गे वाहतूक सुरु करण्यात आली. दुपारी १२ वाजेपर्यंत पुन्हा वाहतूक पूर्ववत झाली असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!