युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सर्वसामान्यांसाठी ओपन जिमची आधुनिक संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेनुसार पवईमध्ये सुद्धा अशाच प्रकारची ओपन जिम निर्माण केली जावी म्हणून शिवसेना पुढे आली असून, शिवसेना शाखा ११५ चे शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी हिरानंदानी समूहाच्यावतीने पालिकेला नुकत्याच हस्तांतरीत करण्यात आलेल्या पालिका उद्यानात पवईकरांसाठी ओपन जिम तयार करण्याची मागणी केली आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळून काम सुरु होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
उच्चभ्रूंच्या घरात जिमची सोय असते, मात्र गरीब, मध्यमवर्गीयांना व्यायाम करण्यासाठी जागाही नसते व जिमचा खर्चही परवडत नाही. जे पाहता युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सर्वसामान्यांसाठी ओपन जिमची आधुनिक संकल्पना मांडली होती. संकल्पनेतील ओपन जिमची महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात दखल घेत पालिकेच्या उद्यानांमध्ये ओपन जिम बसविण्यासाठी २० कोटींची तरतूद सुद्धा केली आहे. या संकल्पनेनुसार पवईमध्ये सुद्धा पालिका उद्यानात ओपन जिमची निर्मिती केली जावी असे स्थानिक शाखा प्रमुख निलेश साळुंखे यांनी पालिका प्रशासनाला पत्र देवून मागणी केली आहे.
पवईतील विविध भागात मोठ्या प्रमाणात उद्यानांचे निर्माण केले गेले आहे. उद्यानात जॉगिंग ट्रॅकच्या निर्मितीमुळे लहान मोठ्यांना आरोग्य निरोगी ठेवण्यात मदत होत आहे. यात निर्माण केल्या जाणाऱ्या ओपन जिममुळे स्थानिकांना अजूनच फायदा होणार आहे.
याबाबत बोलताना साळुंखे म्हणाले, “पवई हे उच्चभ्रू वस्त्यांचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मात्र या उच्चभ्रू वस्त्यांच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सामान्य गरीब कुटुंबे राहत आहेत. त्यांना व्यायाम करण्यासाठी जागाच नाहीत तसेच उच्चभ्रू वस्त्यांमध्ये असणाऱ्या जिमचा खर्चही त्यांना परवडण्यासारखा नाही. अशात आदित्य साहेबांनी मांडलेली संकल्पना खरच या लोकांसाठी लाभदायक ठरत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सह महाराष्ट्रातील विविध शहरात ही संकल्पना जोमाने राबवली जात असून, त्यास स्थानिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हिच संकल्पना पवईकरांसाठी सुद्धा राबवली जावी असा माझा प्रयत्न आहे. ज्यासाठी मी पत्रव्यवहार केले असून आता मंजुरीच्या स्तरात आहे.”
पवईकरांनी सुद्धा या संकल्पनेचे स्वागतच केले आहे. तरुणाईला कसरतीसाठी आपले हक्काचे ठिकाण मिळेल असे काही तरुणांनी सांगितले, तर स्त्रियांसाठी सुद्धा एक वेगळ्या ओपन जिमची निर्मिती उद्यानात केली जावी, ज्यामुळे जास्तीत जास्त स्त्रिया याचा फायदा घेऊ शकतील, असे मत यावेळी बोलताना काही महाविद्यालयीन तरुणींनी मांडले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
पवईकरांच्या वतीने निलेश साळुंखे यांचे आभार..!