पवईच्या शाळांमध्ये ‘पोलीस दीदी’

@ प्रमोद चव्हाण

police didiबालकांवरील अत्याचारांबाबत जनजागृती करण्यासाठी पवई पोलिसांच्यावतीने सोमवारी पवईतील गोपाल शर्मा स्कूल आणि पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये ‘पोलीस दीदी’ परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. पवई पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी या शाळांमध्ये जावून मुलांमध्ये याबाबत जनजागृती करत काय काळजी घ्यावी आणि प्रतिकार कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.

पवई पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनघा सातवसे, महिला पोलीस उपनिरीक्षक कविता नाईक, महिला पोलीस उपनिरीक्षक रिना पवार व महिला पोलीस निरीक्षक अस्मिता लाड यांनी यावेळी विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक अत्याचारांबाबत माहिती दिली. अशा प्रसंगी जोरजोरात ओरडावे, शिक्षकांना-पालकांना याबाबत त्वरित माहिती द्यावी, असे अधिकाऱ्यांच्या तर्फे यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांना अमीर खान यांच्या सत्यमेव जयते कार्यक्रमातील ‘थ्री डेंजर स्पॉट्स’ची चित्रफित दाखवून, डेंजर स्पॉटवर कोणासही स्पर्श करू देवू नये आणि केल्यास मोठमोठ्याने आरडाओरडा करण्याच्या सूचना दिल्या, तसेच चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श ओळखण्याचे मार्गदर्शन केले गेले.

सायबर सुरक्षा आणि नशामुक्ती संदर्भात ही अधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल नंबर आणि पोलीस स्टेशनचे नंबर विद्यार्थ्यांना दिले. “तुमच्या सोबत किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणीसोबत अशी कोणतीही घटना घडत असल्यास आम्ही तुमच्या मदतीसाठी हाकेच्या अंतरावर आहोत” असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये बळकट केला.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!