लॉकडाऊनच्या काळात विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या अनेकांना पोलिसांनी आपल्या दांड्याने प्रसाद दिला आहे. मात्र त्यानंतरही अनेक तरुण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत असल्याने याबाबत पवई पोलिसांनी ठोस पाऊले उचलत विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांवर १८८ नुसार गुन्हे नोंद करून वाहने जप्त करण्यास सुरुवात केली आहे. विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात लोक बाहेर फिरून कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे . कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत.
मुंबईची कायदा सुव्यवस्था हाताळणाऱ्या मुंबई पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडून फिरू नये असे सांगण्यात आले आहे. मात्र यानंतरही अनेक वाहनधारक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. नाकाबंदीत अडवल्यावर काहीतरी कारण देत सुटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा बेशिस्त आणि नियम धाब्यावर बसविणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे.
पवई पोलीस ठाणे हद्दीत सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांच्या नियंत्रणात पवईतील एल अंड टी, आयआयटी मेनगेट, हिरानंदानी अशा विविध भागात तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या नाक्यांवर प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे.
या तपासणीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई तर केलीच जात आहे शिवाय त्यांची वाहने, दुचाकी जप्त केली जात आहेत. शिवाय ही वाहने दंड भरून सोडली जाणार नाहीत, तर लॉकडाऊन संपेपर्यंत पोलीस ठाण्याच्या हद्दीतच जमा केली जाणार आहेत.
“या कारवाईत दिवसभरात किमान ५ ते ७ वाहने आम्ही जमा करत आहोत. सध्या पोलीस ठाण्याच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या वाहनांमुळे जागाच उरली नाही आहे. तरीही विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई चालूच राहणार आहे,” असे याबाबत बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.