पवईतील कॉस्मोपोलीटन इमारतीत एका १३ वर्षीय मुलीने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार संध्याकाळी घडली आहे. मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट सुद्धा लिहून ठेवली आहे. एवढे टोकाचे पाऊल उचलत तिने जीवन संपवल्याने तिच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. यासंदर्भात पवई पोलीस अपमृत्युची नोंद करून अधिक तपास करत आहेत.
या संदर्भात पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लपालीकर कुटुंबीय मुलीच्या शिक्षणासाठी आणि नोकरीच्या निमित्ताने काही वर्षापूर्वीच पुण्यातून मुंबईला शिफ्ट झाले आहे. पवई येथील म्हाडा कॉस्मोपोलीटीन इमारतीत त्यांचा एक फ्लॅट आहे. या फ्लॅटचे दुरुस्तीचे काम सुरु असून, सध्या हे कुटुंब विलेपार्ले भागात राहत आहे.
शुक्रवारी आपल्या कार्यालयीन कामानिमित्त लपालीकर हे पवईतील हिरानंदानी भागात आले होते. यावेळी त्यांची १३ वर्षीय मुलगी अनन्या ही सुद्धा त्यांच्यासोबत आली होती. मुलीला आपल्या पवई येथील फ्लॅटवर सोडल्यानंतर ते हिरानंदानी येथील आपल्या कार्यालयात निघून गेले.
माझी पत्नी मुलीला सतत फोन करत होती, मात्र मुलगी फोन उचलत नसल्याने तिने मला फोन करून, मुलगी फोन उचलत नाहीये घरी जावून बघा असे सांगितले. मी घरी घेवून आपल्याकडील चावीने दरवाजा उघडून पाहिलं असता बेडरूममध्ये छताला असणाऱ्या हुकला ओढणीने गळफास लावून तिने फासी घेतल्याचे मला आढळून आले, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात लपालीकर यांनी म्हटले आहे.
गळफास घेवून आत्महत्या
“आम्ही घरी गेलो तेव्हा मुलीला उतरवून बेडवर ठेवले होते. तिला हिरानंदानी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
“चौकशीत आम्हाला मुलगी अभ्यासात खूपच हुशार होती. विलेपार्ले येथील एका नामांकित विद्यालयात सध्या तिचे शिक्षण सुरु आहे. बिआरसी येथे तिचे सिलेक्शन झाले होते. अंधेरी येथील अलाईन इंटीस्ट्यूटमध्ये सुद्धा ती प्रशिक्षण घेत होती. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते बंद होते. असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
“आत्महत्या केलेल्या ठिकाणावरून आम्हाला मुलीने इंग्रजी भाषेत लिहलेली एक सुसाईड नोट मिळून आली आहे. आपल्या आई वडिलांना उद्देशून तिने ही नोट लिहिली आहे. अभ्यासात मुलगी खूपच हुशार होती. तिने मानसिक तणावातून आत्महत्या केली असल्याचे समोर येत आहे.” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.
No comments yet.