पवईत कोरोना बाधित मिळण्याचा वेग आता हळूहळू मंदावू लागला आहे. २९ मे ते ३ जून २०२० या पाठीमागील ६ दिवसात २७ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. शुक्रवार २९ मे रोजी ४ जणांना, शनिवार ३० मे रोजी ६ जणांना, रविवार ३१ मे रोजी ५ जणांना, सोमवार १ जून ३ जणांना, मंगळवार २ जून ६ जणांना, तर बुधवार ३ जून रोजी ३ जणांना संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. या बाधितांच्या आकड्यांसोबतच पवईतील कोरोना बाधितांची संख्या ३२९ झाली आहे. विशेष म्हणजे घरी परतणाऱ्या लोकांची संख्या ही मोठी असून ४८% रिकव्हरी रेट नोंदवण्यात आला आहे.
शुक्रवार, २९ मे
गणेशनगर, पंचकुटीर येथील ६३ वर्षीय महिला आणि ५० वर्षीय पुरुष यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याच दिवशी आयआयटी मेनगेट समोरील रमाबाई आंबेडकर नगर येथील ५० वर्षीय महिलेला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. तर शहा कंपाऊंड, पवई विहार येथे राहणाऱ्या ४४ वर्षीय इसमाला सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे, तो हिरानंदानी गार्डन जवळील एका इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.
शनिवार, ३० मे
अपना बजार लेन जवळील चाळसदृश्य वस्तीत ४२ वर्षीय पुरुष आणि इंदिरा नगर, आयआयटी मार्केट येथील १९ वर्षीय तरुण यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याच बरोबर चैतन्यनगर येथील ७७ वर्षीय पुरुष आणि ६५ वर्षीय महिला यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. तसेच रहेजा विहार येथील मेपल लीफ इमारतीत राहणाऱ्या दोघांना सुद्धा याचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहेत.
रविवार, ३१ मे
पवईतील मुख्य गणेशघाट जवळील नवीन म्हाडा इमारतमधील ४० वर्षीय महिला; हनुमान रोड, आयआयटी मार्केट येथील ३५ वर्षीय महिला; सैगलवाडी येथील ६६ वर्षीय पुरुष यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर हिरानंदानी गार्डनमधील एका इमारतीच्या सुरक्षारक्षकाला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच शिवभगतानी मनोर येथील ५५ वर्षीय पुरुषाला सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.
सोमवार, १ जून
चैतन्यनगर येथील ३५ वर्षीय आणि ५० वर्षीय पुरुष तर शिवनेरी हिल कॉलोनी, आयआयटी मार्केट येथील ४२ वर्षीय पुरुष सुद्धा कोरोना बाधित मिळून आले आहेत.
मंगळवार, २ जून
आयआयटी मेनगेट समोरील चाळ सदृश्य वसाहतीतील रमाबाई आंबेडकरनगर येथील ६० वर्षीय महिला, गोखलेनगर येथील ६६ वर्षीय पुरुष, तर इमारत भागातील टेलीकॉम स्टाफ क्वाटर्समधील ६४ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच चैतन्यनगर येथील ४९ वर्षीय पुरुष, पवई म्हाडा वसाहत क्रमांक १६ येथील ३१ वर्षीय पुरुष आणि म्हाडा वसाहत क्रमांक ९, रामबाग येथील ४२ वर्षीय पुरुष यांना सुद्धा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे.
बुधवार, ३ जून
गोखलेनगर येथील २५ वर्षीय महिला, चैतन्यनगर येथील ५५ वर्षीय पुरुष आणि टाटा पॉवर कॉलोनी येथील ४२ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
या सर्वात पवईकरांसाठी सकारात्मात बातमी ही आहे की, पवईत एकीकडे कोरोना बाधित मिळण्याचा वेग मंदावला आहे, तर दुसरीकडे पवईतील कोरोना बाधितांचा रिकव्हरी रेट वाढला असून, आतापर्यंत ४८% बाधित बरे होऊन घरी परतले आहेत.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
नेहमीच सत्य माहिती देऊन आपण लोकांनां मार्गदर्शन करत आहात,तसेच पवई तील नागरिकांना धीर देत आहात आणि प्रशासनास उत्तम सहकार्य करत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार .?